जळगाव : प्रतिनिधी
लेवा पाटीदार कम्युनिटीच्या फेसबुक पेजवर लेवा डान्स आयडॉल २०२१ च्या ऑनलाईन स्पर्धेत जळगावच्या अपंग मानसी पाटीलहिने दैदिप्यमान यश संपादन करत स्पर्धेतील ‘लेवा डान्स आयडॉल २०२१’ व लेवा पाटीदार कम्युनिटी फेसबुक अॅडमिन चॉईस असे पुरस्कार प्राप्त केले आहे. “लेवा डान्स आयडॉल २०२१” ही ऑनलाईन डान्स स्पर्धा, लेवा टीचर्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित लेवा पाटीदार कम्युनिटी“ या फेसबूक ग्रुपवर समाजातील सुप्त कलागुणांना चालना मिळावी, लहानापासून थोरा पर्यंत प्रत्येकाला या उपक्रमाच्या माध्यमातून आपली कला सहजतेने सादर करता यावी, या गोष्टीचा विचार करून “लेवा डान्स आयडॉल २०२१“ हा उपक्रम शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या समन्वयक बंधु-भगिनींच्या सहकार्याने राबविण्यात आला.
मानसी पाटील हिने गट ब युवा या गटातून भाग घेतला होता त्यात मानसीने वेदनेचा वेद करून अपंगत्वावर मात करून सकारात्मक विचार मनात धरून कृतिशील जगणारी जळगावच्या अयोध्या नगरातील मानसी हेमंत पाटील एकाच डाव्या पायाने नृत्य कलेत निपुण असलेली दिव्यांग नृत्यांगना ! अदम्य जिद्द, ध्येयवाद, सकारात्मक वृत्ती, खंबीरपणा ही मानसीच्या जगण्याची चतु:सूत्री सबलांनाही दीपस्तंभाप्रमाणे अक्षय प्रेरणा देते.
युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल अश्या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा प्रोत्साहन देणारा लेवा डान्स आयडॉल – २०२१ या पुरस्काराने तसेच लेवा पाटीदार कम्युनिटी फेसबुक ग्रुप ऍडमिन चॉईस रोख रक्कम रु. १०,००० /- असे पुरस्कार देऊन मानसीला सन्मानित केले.
मानसी जन्मजात अपंग नव्हती… इयत्ता दहावीत असताना दिनांक १६ नोव्हेंबर २०१४ रोजी क्लासला जाताना खेडी गावालगतच्या महामार्गावर दुचाकीचा धक्का लागून ती हायवेवर पडताच भरधाव गॅसचा टँकर उजव्या पायावरून गेला. दोन अवघड शस्त्रक्रिया झाल्या परंतु दुर्दैवाने अखेर मांडीपासून पाय कापावा लागला. तारुण्यात पदार्पण केलेल्या मानसीच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. “अपंगत्वाचे लेवून वसने, कशी पहावी सुंदर स्वप्ने? अपंगत्वाचा राक्षस करतो, आयुष्याची उजाड राने “ क्षणोक्षणी व पदोपदी येणार्या असाह्य शारीरिक व्यंगाच्या असहाय्यतेतून अपंग न्यूनगंडाने एकाकी व निराशावादी होतात परंतु अवघ्या चार महिन्यांनी मानसीने परीक्षा देऊन ७६% गुणांनी घवघवीत यश मिळवून अपंगत्वावर मात केली.
घरची परिस्थिती हलाखीची…
वडील हेमंत यांचे शिक्षण फक्त चौथी शिकलेले आणि आई जयश्री याचे शिक्षण दहावीपर्यंत . मोल मजुरीवर घर चालायचे … अशावेळी नातेवाईकांनी मदत केल्यामुळेच उपचार झाला . एकट्या लाडक्या बहिणीला अपंगत्व आल्याने मोठाभाऊ पुष्कर अकाली प्रौढ झाला . जिद्दीने कमवा आणि शिका या पद्धतीने पोटाला चिमटा देऊन त्याने शिक्षण घेतले . आता तो पुण्याला नोकरीला आहे . आईची माया ,वात्सल्य हा माझा औषधोपचार व पुष्कर दादा आणि वडिलांनी दिलेले प्रोत्साहन हाच माझा मानसोपचार आहे असे मानसी अभिमानाने सांगते. अल्पशिक्षित मातापित्यांनी मानसीच्या इच्छा आकांक्षांचे नंदनवन फुलवून मनोबल वाढविले. मानसीच्या नृत्याच्या आवडीच्या सुप्त इच्छेने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली . दुर्दम्य इच्छाशक्तीने दोन वर्षात मानसीने एका पायावर तोल सांभाळण्याचा दररोज एक ते दोन तास व्यायाम करीत स्वतःला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवलं .
द वार ऑफ एडिटर सिझन या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक, धनाजी नाना कॉलेजच्या वार्षिक समारोहात द्वितीय पारितोषिक , डान्सिंग स्टार्स तसेच गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या स्पर्धेतही सलग दोन वर्षे आणि वार्षिक देनोवो क्लासच्या स्पर्धेतही सलग दोन वर्षे सन २०१९ -२० मध्ये बक्षिसे पटकावली . बॉलीवूड डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवण्याचा मानसीचा मानस आहे . सलाम बॉम्बे मधील तुही रे …,जो जो भेजी थी दुवा , जादू की झप्पी, घूमर , या गाण्यांवर मानसीचा पदन्यास आणि नृत्याविष्कार आणि सानंद आत्मविश्वास पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.
मानसीत प्रचंड आत्मविश्वास भरलेला आहे. ती म्हणते, “एमबीए (फायनान्स) झाल्यानंतरसुद्धा मी फक्त आणि फक्त नृत्य या कलेतच करियर करणार असून त्यासाठी माझी मेहनत सुरू आहे. नृत्यगुरु योगेश मर्दाने यांच्याकडे मी धडे गिरवीत आहे .बॉलीवूड आणि कंटेंम्पररी डान्स प्रकार मी शिकत आहे. देशाची नव नृत्य संस्कृती दाखवित असताना अंगविक्षेप न करता या कलेची आराधना करण्यावर माझा भर राहील. मानसी म्हणते , जन्मदात्या मातापित्यां प्रमाणेच अपंगत्व आल्यानंतर मला आर्थिक सहकार्य करणार्या संस्था आणि माझ्या कलागुणांना प्रोत्साहन देणार्या गुरुजनांना मी कदापि विसरू शकत नाही.