जळगाव ः प्रतिनिधी
जलरंगातील टवटवीतपणा, रंगसंगती, भावतरलता ही चित्रकार सचिन मुसळेंच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक चित्र हे नवा आशय व विचार देते. प्रत्येक कलाप्रेमींसाठी प्रतिबिंब चित्रप्रदर्शन हे आनंदपर्वणीच ठरेल, असे मत संपदा उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.
जळगावातील पु. ना. गाडगीळ गॅलरीत आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
मुसळे यांनी पाहिलेला निसर्ग, रंग, रेषा यांच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे कॅन्व्हासवर उतरवला आहे. हे अनोखे निसर्ग दर्शन या प्रदर्शनातून अनुभवायला मिळते, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. कृषी अधिकारी अनिल भोकरे, चित्रकार प्राचार्य राजेंद्र महाजन, प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, संदीप पोतदार, सचिन मुसळे उपस्थित होते. प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी सचिन मुसळे यांच्या चित्रांची वैशिष्टये मांडली.
या प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार एल. झेड. कोल्हे, राजू बाविस्कर, नीलेश चौधरी, भिका पाटील, विकास मलारा, विजय जैन, कैलास विसावे, श्यामकांत वर्डीकर, राजेश यावलकर, जितेंद्र सुरळकर, अतुल मालखेडे, अविनाश मोघे, राजेंद्र जावळे, पंकज नागपुरे, अर्चना शेलार, आनंद पाटील, उज्ज्वला मुसळे, सुनील महाजन, ज्ञानेश्वर शेंडे आदी उपस्थित होते. चित्रप्रदर्शन 30 मे पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.