जलयुक्त शिवार-२ योजनेला सुरुवात,
१६० सिंचन प्रकल्पांना फेरमान्यता
मुंबई (प्रतिनिधी) –
राज्यातील सिंचन प्रकल्पांना वेग देण्यासाठी १६० प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. जलयुक्त शिवार-२ योजनेला सुरुवात केली आहे. तसेच नदीजोड प्रकल्पांवरही विशेष भर दिला जात आहे, अशी माहिती नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना लाभ देणाऱ्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाचा पुढील टप्पा कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाच्या निविदा जाहीर झाल्या असून या प्रकल्पाचा एकूण खर्च ७ हजार १५ कोटी रुपये आहे त्याद्वारे ९.१९ टीएमसी पाणी गिरणा नदीत सोडण्यात येणार आहे.
विरोधकांनी सोयाबीन खरेदीबाबत टीका केली असली, तरी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राने सर्वाधिक सोयाबीन खरेदी केल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले, “मध्यप्रदेशात ६ लाख मेट्रिक टन, राजस्थानात ९८ हजार मेट्रिक टन, गुजरातमध्ये ५४ हजार मेट्रिक टन तर महाराष्ट्राने ११.२१ लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेत १२८ टक्के अधिक आहे, असे ते म्हणाले.
नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणा नदी पात्रात ९.१९ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, ४९ हजार ७६१ हेक्टर क्षेत्र सिंचित होईल. सिंचन प्रकल्प जलद गतीने मार्गी लागत असून भविष्यात महाराष्ट्र जलसमृद्ध राज्य होण्याच्या दिशेने पुढे जात आहे.