जमावाने ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यानंतर ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा देणारी ती तरुणी कोण?

0
28

बंगळुरू : वृत्तसंस्था । कर्नाटकच्या कॉलेजमधील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत मुस्कान नावाची एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतो. यानंतर तरुणीदेखील त्यांना उत्तर देत ‘अल्लाहू अकबर’ ची घोषणा देते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कर्नाटकच्या मांडयामधील आहे.

या व्हायरल व्हिडीओवर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मुलीच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी तरुणीला सलाम केला आहे. “मी या तरुणीच्या आई-वडिलांना सलाम करतो. या मुलीने एक उदाहरण ठेवले आहे”. भीक मागून आणि रडून काही मिळत नाही असे ओवैसी या व्हिडीओत म्हणाले आहेत. या मुलीने जे काम केले त्यासाठी फार धाडस लागते असेही ओवैसी म्हणाले आहेत.

ओवैसींनी आपल्या ट्विटमध्ये कर्नाटकमधील मुस्लीम तरुणींचे कौतुक केले आहे. येथील मुस्लिम तरुणींनी हिंदुत्ववादी जमाविरोधात धाडस दाखवल्याचे ते म्हणाले आहेत. तरुणींना आपल्या संवैधानिक अधिकारांचा योग्य वापर केला असून जे झाले त्यामागे राज्य सरकार होते असा आरोप ओवैसींनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांवरही निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दोन वेळा बोलले पण एकदाही कर्नाटकमधील घटनेवर भाष्य केले नाहेी. त्यांचे मौन नेमके काय सांगते? हेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

तरुणीने आपल्यासंबंधी काय सांगितलं आहे ?
यासंदर्भात मुस्कानने सांगितले की, आपण कॉलेजमध्ये एका असाईनमेंटसाठी गेलो होतो. ते लोक आपल्याला कॉलेजमध्ये जाऊ देत नव्हते. बुरखा हटवल्यानंतरच आत जायचे असे ते सांगत होते. जेव्हा मी गेले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामध्ये काही कॉलेजच्या आतील तर अनेक बाहेरचे होते.

पुढे तिने सांगितलं की, जेव्हा त्यांनी घोषणा दिल्या तेव्हा मी अल्लाहू अकबरची घोषणा दिली. आपले शिक्षक आणि प्राध्यापकांनी पाठिंबा दिल्याचेही तिने म्हटले आहे. बुरखा हटवला नाही तर आम्हीदेखील भगवा कपडा हटवणार नाही अशी धमकी ते देत होते असा आरोप तिने केला आहे. ते वारंवार मला घेरत होते असेही तिने सांगितले आहे.

वाद कोणत्या घटनेमुळे?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते.

त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.

हिजाबच्या वादामुळे कर्नाटकात सुरू झालेले आंदोलन मंगळवारी राज्यभर पसरले. कॉलेज कॅम्पसमध्ये दगडफेकीच्या घटनांमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सरकार आणि उच्च न्यायालयाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थिनींना हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी त्यांच्या एका याचिकेवर न्यायालय विचार करत आहे. या प्रकरणाचे मोठ्या वादात रुपांतर झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

हिजाबवरील वादात मलालाची उडी
नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्त्यी मलाला युसूफझाई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. मलालाने ट्विटरवरुन या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे.“कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे,” असे मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here