जगातील सर्वात उंच पूल भारतीय रेल्वेने बांधला

0
33

जम्मू, वृत्तसंस्था । भारतीय रेल्वे जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधत आहे. चिनाब पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल यावर्षी डिसेंबरपर्यंत रेल्वे वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर उंच असून त्याची लांबी सुमारे 1.3 किलोमीटर इतकी आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या पुलाचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ढगांमध्ये दिसणारा जगातील सर्वात उंच कमान असलेला चिनाब पूल.’ अतिशय सुंदर दिसणारे हे चित्र एखाद्या पेंटिंगपेक्षा कमी नाही. हा पूल एवढा उंच आहे की, त्याच्या काही फूटखाली ढगही दिसत असल्याचे चित्रात दिसतेय.

चिनाब नदीपात्रापासून सुमारे 359 मीटर उंचीवर बांधण्यात येत असलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या कमानीचे काम गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पूर्ण झाले होते. या कमानीचे एकूण वजन 10619 मेट्रिक टन असून त्याचे भाग भारतीय रेल्वेने प्रथमच केबल क्रेनद्वारे उभारले आहेत.

हा पूल बांधण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे काश्मीर खोऱ्याची कनेक्टिव्हिटी वाढवणे हे आहे. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पांतर्गत 1486 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. त्यामुळे उत्कृष्ट अभियांत्रिकीचा नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.

कटरा ते बनिहाल हा 111 किमी लांबीचा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची ही मोठी झेप आहे. अलीकडच्या इतिहासातील भारतातील कोणत्याही रेल्वे प्रकल्पासाठी हे निश्चितच सर्वात मोठे सिव्हिल इंजिनीअरिंग आव्हान आहे. हा पूल 1315 मीटर लांब असून नदी पातळीपासून 359 मीटर उंचीवर बांधला जात आहे, हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. पॅरिसमधील ऐतिहासिक आयफेल टॉवरपेक्षा हा 35 मीटर उंच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here