रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील अहिरवाडी येथील मोहगण रस्त्यावरील बाहेरपूरा परिसरातील एका घरातून घरमालक घरात झोपलेले असतांनाच अज्ञात चोरट्यांनी दिड लाखाच्या रोकडसह सुमारे 15 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अहिरवाडी येथे मोहगण रस्त्यावर बाहेरपूऱ्यातील रमेश शामराव महाजन यांचे घर आहे. रात्रीच्या सुमारास महाजन कुटुंबिय झोपलेले असतांनाच चोरट्यांनी घराच्या मागे शेतातील तारकंपाऊंड तोडून घराच्या मागील भिंतीचे सिमेंट खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिने व दिड लाखाच्या रोकडसह सुमारे 15 लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. चोरी झाली तेव्हा घरमालक रमेश महाजन त्यांची पत्नी, आई हे समोरील खोलीत झोपलेले होते. घरातील कुलर खराब झाल्याने मुलगा बाहेर झोपला होता. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रमेश महाजन यांच्या घरातील 15 लाखांचा ऐवज लांबविला आहे. दरम्यान, रमेश महाजन यांच्या शेजारील सुरेश फकीरा महाजन यांच्या घरात देखील चोरट्यांनी हात साफ केला. यात त्यांनी घरातील सामानाची फेकाफेक करुन फ्रिजमध्ये ठेवलेला आंब्याचा रस रिचवून घरातील 700 रुपये चोरुन नेले. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीसांनी घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रावेर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते.