नाशिक : प्रतिनिधी
देशातील भाजपाशासित राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. फडणवीसांच्या काळात सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या ४७ घटनांमुळे २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. पण भाजपाच्या चित्रा वाघ यांना त्या प्रकरणाचा विसर पडलेला दिसतो. त्यांनी थोडे मागे वळून पाहिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी व्यक्त केले.
नाशिक दौऱ्यावर असताना चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराबाबत महाविकास आघाडीवर केलेल्या आरोपांना राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण राबवले आणि त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील भाजपा नेते महाविकास आघाडी सरकारला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, अशी टीका त्यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांत भाजपाशासित राज्यांमध्ये महिलांवरील हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. उत्तरप्रदेशातील हाथरस येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना योगी सरकारने दडपण्याचा प्रयत्न केला. २०१६ मधील कोपर्डी घटनेनंतर सुप्रियाताईंनीच तत्कालीन फडणवीस सरकारला धारेवर धरले आणि आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली, असेही चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले.