साईमत मलकापूर प्रतिनिधी
चाळीस बिघा परिसरातील अभ्यासिका ही सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त वातानुकूलित अशी राहणार असून ही अभ्यासिका विदर्भातील पहिल्या क्रमांकावर असावी या संकल्पनेतून निर्मिती केली जात आहे. किंबहुना याच संकल्पनेची पूर्तता व्हावी या अनुषंगाने आ.राजेश एकडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या धर्तीवर आ.एकडे यांनी निर्मिती सुरू असलेल्या अभ्यासीकेची पाहणी करीत न.प.चे बांधकाम अभियंता आकाश वाघ यांचेशी बांधकाम बाबत चर्चा करीत कामाच्या योग्यतेबाबत सूचना दिल्या.
आ. राजेश एकडे यांचे प्रयत्न आणि संकल्पनेतून तसेच वैशिष्ट्यपूर्ण अनुदानामधून शहरातील चाळीसबिघा परिसरात न. प. शाळा क्रमांक ४ टीपी स्कीम नं. १ मधील भूखंड क्रमांक २४८ वर सर्व सुविधांनी युक्त प्रशस्त वातानुकूलित ६ कोटी १२ लक्ष ६०० रुपयांच्या वातानुकूलित अभ्यासिका उभारली जात आहे. या अभ्यासिकेचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या बांधकामाची प्रत्यक्षरीत्या पाहणी करीत बांधकामाबाबत आमदार राजेश एकडे यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान न. प. बांधकाम विभागाचे अभियंता आकाश वाघ यांना बांधकामात कसलीही उणीव निघता कामा नये अशा सूचना केल्या.