चंद्रपूर येथील इरई धरणावर ५८० कोटी रुपये खर्च करून १०५ मेगावॅटचा तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. १५ महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार असून यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
या प्रकल्पासाठी ५८० कोटींचा खर्च येणार असून याची क्षमता १०५ मेगावॅट असणार आहे
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधले. यातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा केला जातो. या धरणावर सौर ऊर्जा पार्कची निर्मिती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल. या ऊर्जा पार्कचे पर्यटकांना अवलोकन करता यावे यासाठी ‘गॅलरी’ व ‘सेल्फी पॉईंट’चे बांधकाम करण्यात येणार आहे. चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाघ व बिबट्यांचा वावर असल्याने कर्मचारी व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाला दिलेत. बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविम सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महानिर्मितीचे संचालक संचलन चंद्रकांत थोटवे व इतर अधिकारी उपस्थित होते.