जळगाव ः प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वात मोठी सोसायटी असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ‘ग. स. सोसायटी` च्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काल रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोसायटीच्या स्वीकृत संचालकांची अधिकृत निवड जाहिर करण्यात आली.
‘ग. स. सोसायटी` च्या नवनिर्वाचित संचालकांची ही बैठक म्हणजेच सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची पहिलीच सभा होय. सोसायटीच्या अधिनियमानुसार सभेमध्ये दोन स्वीकृत संचालक स्वीकारण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने या सभेत सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील आणि अन्य संचालकांच्या उपस्थितीत ‘ग. स. सोसायटी`चे ‘स्वीकृत संचालक` म्हणून जळगाव शहराच्या प्रथम नागरिक, शिक्षिका तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्रीताई सुनिल महाजन यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.
दरम्यान, मराठा समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते राम पवार यांची निवड आधीच जाहीर झाली होती.त्याअनुषंगाने या सभेत महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासमवेत दोन्ही स्वीकृत संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, सहकारचे गटनेते अजबसिंग पाटील, महेश पाटील, भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, योगेश इंगळे, अजय देशमुख, विश्वास पाटील, मंगेश भोईटे,रागिणी चव्हाण,वाल्मिक पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनिल महाजन उपस्थित होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना, ग.स. सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संपूर्ण संचालक मंडळाने माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याला कायम ठेवीत विश्वासास तडा जाणार नाही, तो नेहमी जपला जाईल, असा विश्वास देत, मुळात मी स्वत: शिक्षक असून या सोसायटीत जास्तीत जास्त सदस्य संख्या ही शिक्षकांचीच असल्यामुळे या सर्व सभासदांना न्याय देण्यासाठी नवनिर्वाचित सर्व संचालकांच्या निर्णया सोबत सदैव राहीन, अशी ग्वाही देत महापौर जयश्रीताई महाजन यांनी यावेळी सर्वांप्रती आभार व्यक्त केले.