पणजी : वृत्तसंस्था
गोव्यात आणि मणिपूरमध्ये भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. असे असले तरी दोन्ही राज्यांमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला होता. मात्र आता हा सस्पेन्स दूर झाला असून गोवा आणि मणिपूर या दोन्ही राज्यांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री कायम राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोव्यामध्ये प्रमोद सावंत तर मणिपूरमध्ये बीरेन सिंह हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यामध्ये झालेल्या भेटीनंतर पंतप्रधानांनी सांगितले की, नुकताच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या शानदार विजयासाठी मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना शुभेच्छा. आमचा पक्ष मणिपूरच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोव्यातील भाजपाच्या नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणाले की, आमचा पक्ष गोव्यातील लोकांचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा राज्याची सेवा करण्याची संधी दिली आहे. आम्ही येणाऱ्या काळात गोव्याच्या प्रगतीसाठी काम करू.