ढाका, वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह सापडला आहे. ढाक्यातील केरानीगंज येथील एका पुलाजवळ तिचा मृतदेह गोणीत सापडला होता. सोमवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी कदमटोली भागातील अलीपूर पुलाजवळ परिसरातील स्थानिक लोकांनी अभिनेत्रीचा मृतदेह पाहिला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतदेह ताब्यात आल्यानंतर आम्ही कारवाई करत अभिनेत्रीच्या पतीला ताब्यात घेतले आहे,असेही पोलिसांनी सांगितले.
शरीरावर अनेक जखमा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. हत्येनंतर रायमा इस्लाम शिमूचा मृतदेह रविवारी पुलाजवळ गोणीत फेकून दिला होता. रविवारी शिमू बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कलाबागन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.



