जळगाव ः प्रतिनिधी
गांधीजींना नाकारायचे, गांधीजींना हद्दपार करायचे अशा वल्गना समाजात अनेकस्तरातील लोक करीत असतात. कितीही नाकारायचा म्हटला तरी गांधी स्वीकारलेच कसे जातात, असे अभ्यासपूर्ण सादरीकरण परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी परिवर्तनच्या कलावंतांनी केले. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित गांधी नाकारायचा पण नाकारणार कसा?’ या नाटकाचे अभिवाचन करण्यात आले.
अभिवाचनातून गांधी विचारांचे विरोधक, त्यांच्या प्रश्नांमागील वास्तव व इतिहासाचे वस्तुनिष्ठ दाखले देत हे अभिवाचन सादर केले. सहज गमतीत सुरू झालेली चर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समाज न्यायालयात आरोपीच्या पिंजर्यात उभे करते. त्यांच्यावर खटला चालवला जातो. त्यांच्यावर विविध आरोप करण्यात येतात. गांधींच्या माध्यमातून इतिहासाचं आकलन, एकूणच असलेले समज, समाज माध्यमातून पसरलेले गैरसमज आणि आपल्या वैचारिक गोंधळात चिमटे घेत, शेरेबाजी करत वाचन करणार्या कलाकारांनी प्रेक्षकांना हसवले. अंतर्मुख केले. लाखभर पुस्तकं लिहिली गेलीत ते गांधी न वाचता ऐकीव माहितीवर आपण मनात गांधींची चुकीची प्रतिमा उभी करत राहतो. इथपर्यंत प्रेक्षक येऊन पोहोचतो. गांधीजींची भूमिका विजय जैन यांनी साकारली. त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मंजूषा भिडेंची महिला प्रतिनिधी, मंगेश कुलकर्णीचा कर्मठ म्हातारा, नारायण बाविस्कर, होरीलसिंग राजपूत यांनी सामान्य माणूस तंतोतंत प्रेक्षकांच्या मनात उभा केला. हर्षल पाटील यांनी गांधींबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देत निवेदक व मध्यवर्ती भूमिका साकारली. या ऑनलाइन महोत्सवाला महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची संकल्पना वसंत गायकवाड, पार्श्वसंगीत राहुल निंबाळकर व श्रद्धा कुलकर्णी यांनी दिली. अभिवाचन महोत्सवात आज सायंकाळी ६ वाजता कवी अशोक कोतवालांची कविता हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.