जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या (ग.स.) 15 महिन्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात संस्थेत बेशिस्त वातावरण तयार झाले आहे. प्रशासकीय काळात केलेल्या विविध आर्थीक तरतूदी देखील विसंगत आहे. या काळात कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वातावरणामुळे संस्थेत आता शिस्त लावणे गरजेचे आहे. त्यामुळे परिणामकारक बदल केला जाणार आहे. तसेच सभासदांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचननाम्याची पूर्तता म्हणून सभासदांसाठी विविध सवलती देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, प्रशासक काळात 22 कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांचे उपदानाचे 4 कोटी देणे आहे मात्र 1 कोटी 95 लाखाचीच तरतूद केली आहे.त्यामुळे तरतूदीत बदल करावे लागणार आहे. मागील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात दोन वर्षात 6 हजार सभासदांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे संभासदसंख्या 34 हजारापर्यंत आली आहे. विरोधकांच्या अनेक कुरघोड्या नंतरही सभासदांनी सहकार गटाला कौल दिला आहे. सभासदांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी निवडणुकीनंतर महिन्याभरातच 75 टक्के वचननाम्याची पूर्तता केली असून संचालक मंडळाने सभासदहिताचे विविध निर्णय घेतले आहे.
सहकार गटातील प्रत्येक सदस्याला प्रमुख पदावर संधी दिली जाणार असून पाच वर्षात पाच अध्यक्ष व पाच उपाध्यक्षांची नियुक्ती केली जाणार असल्याचेही उदय पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, गटनेते अजबसिंग पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, महेश पाटील, रागिणी चव्हाण, अजय देशमुख, विश्वास पाटील, एस. एस. पाटील, योगेश इंगळे, मंगेश भोईटे, तज्ज्ञ संचालक जयश्रीताई महाजन,राम पवार,गटाचे कोषाध्यक्ष व्ही.झेड.पाटील,व्यवस्थापक वाल्मिक पाटील उपस्थित होते.
संचालक मंडळाने घेतलेले निर्णय
जामीन कर्ज व अपंग सभासद कर्ज व्याजदर 9 टक्के. वर्गणीचे आतील कर्ज व्याजदर 7.5 टक्के. विशेष कर्ज व्याजदर 10.5 टक्के. परिषद ॲडव्हान्स कर्ज व्याजदर 11.5 टक्के. विशेष कर्ज मर्यादा 15 लाखापर्यंत. सर्व ठेवींवर व्याजदरात अर्धा टक्के वाढ. सभासद अभिनव ठेव योजनेत 6.75 टक्के व्याज.जनता अपघात विमा संरक्षण मर्यादा 10 लाखापर्यंत. मृत सभासदाला 100 टक्के कर्जमाफी. मृत व लवादी सभासदांच्या वारसास ओटीएसची संधी. डीसीपीएस धारकांसाठी विशेष योजना.