साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
शिवसेनेचे (Shivsena)बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी ३७ आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर त्यांच्याकडे पक्षातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याने त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कायदा लागू होणार नाही. आता त्यांना पक्षातील खासदारांचाही पाठिंबा मिळू लागला आहे.१७ खासदार आणि ४०० आजी-माजी नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मुबिश अनेक ठिकाणचे कार्यकर्तेही शिंदेंच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत.
भाजपासोबत युती करा, शिवसेना खासदारांची मागणी
वाशीमच्या खासदार भावना गवळी(Bhavna Gawali) या शिंदेंना पाठिंबा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच गवळी यांनी शिवसेनेला भाजपशी युती करण्याचा सल्ला दिला होता. २२ जून रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गवळी म्हणाल्या होत्या, “शिवसनेचे आमदार तुम्हाला हिंदुत्वाच्या अजेंड्यावर मोठा निर्णय घेण्याची विनंती करत आहेत. हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या भावना समजून घेऊन, त्यांच्यावर कारवाई न करता, अवघड असला तरी निर्णय घ्यावा, अशी विनंती गवळी यांनी केली होती.
ठाण्यासोबत रायगड आणि पालघरमधील नगरसेवक बंडाच्या तयारीत
ठाण्यातील एका नगरसेवकाने सांगितले की “ठाणे शहरात ६४ नगरसेवक आहेत आणि ते सर्व, त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदे साहेबांसोबत आहेत. आम्हाला बाजू निवडावी लागली तर आम्ही एकनाथ शिंदेंच्या बाजूने असू. येत्या काही महिन्यांत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्व नगरसेवकांना सध्याच्या राजकीय संकटाबाबत प्रसारमाध्यमांशी न बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाण्यासोबत रायगड आणि पालघरमधील नगरसेवकही बंड करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.