जळगाव ः प्रतिनिधी
केंद्राचे जाचक धोरण व वाढत्या महागाईच्या विरोधात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज सकाळी 10 वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी काढण्यात आलेली महागाईची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व त्यानंतर घालण्यात आलेला ‘गोंधळ’ या आंदोलनाचे आकर्षण ठरले. या आंदोलनात माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, सतीष अण्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
शहरातील आकाशवाणी चौफुलीजवळील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून हा मोर्चा (प्रतिकात्मक अंत्ययात्रा) निघाला. महागाईविरोधात आवाज उठविण्यासाठी गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी महागाईविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला तसेच महागाईला जबाबदार असणाऱ्या व त्याबद्दल चुप्पी साधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गगनभेदी घोषणा देण्य्ाात आल्या.
या हल्लाबोल आंदोलनात खा. सुप्रिया सुळे यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर,सतिशअण्णा पाटील,जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे,महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगलाताई पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एजाज मलिक, युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,जिल्हा समन्वयक विकास पवार, माजी आमदार मनिष जैन,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील,नामदेवराव चौधरी,पक्ष प्रवक्ते योगेश देसले, रिंकू चौधरी,उमेश नेमाडे, किरण राजपूत,सुनिल माळी, अरविंद मानकरी, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी,प्रतिभा शिरसाठ, जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रतिकात्मक अंत्ययात्रा
गेल्या कित्येक दिवसापासून दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व ग ॅस दरवाढ झपाट्याने वाढ सुरुच आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आकाशवाणी कार्यालयातून गॅस हंडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. पक्ष कार्यालयापासून निघालेला हा निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला जावून धडकला.त्याठिकाणी महिलांनी ठिय्या मांडून ‘गोंधळ’घातला.