मुक्ताईनगर : प्रतिनिधी
भाजप खासदार खासदार रक्षा खडसे यांची शर्म-अल-शेख (इजिप्त) येथे होणाऱ्या दोनदिवसीय आठव्या आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खडसे यांचे नाव तीन सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी निश्चित केले आहे.
शर्म-अल-शेख (इजिप्त) हे शिनाई द्वीपकल्पातील वाळवंट आणि तांबडा समुद्र यांच्यामधील किनारपट्टीवर वसले असून आंतरराष्ट्रीय परिषदा आणि राजनैतिक बैठकांसाठी या शहराला ओळखले जाते. या ठिकाणी होणाऱ्या संमेलनात जागतिक पर्यावरण हवामान बदलावर चर्चा होणार आहे. या चर्चासत्रात जगातील तरुण पिढी सहभाग नोंदविणार असून आपले विचार मांडतील. खासदार रक्षा खडसे आयपीयू इंटर-पार्लमेंटरियन फोरमच्या एशिया पॅसेफिक ग्रुपवर चार वर्षांपासून बोर्ड मेंबर आहेत. यामाध्यमातून आतापर्यंत रक्षा खडसे यांनी अनेक संमेलन व चर्चासत्रात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाची भूमिका जागतिक मंचावर मांडली आहे. मार्च महिन्यात त्यांनी नुसा-दुआ, बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या १४४ व्या पाच दिवसीय बैठकीतही त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व केले होते.
दरम्यान इजिप्त येथे होणारे संमेलन ‘इंटर-पार्लमेंटरी युनियन (IPU) व इजिप्तशियन पार्लमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जूनला आयोजित करण्यात आले आहे. भारतीय शिष्टमंडळ या संमेलनासाठी मंगळवारी (ता. १४) दिल्ली येथून रवाना होणार असून, १८ जूनला भारतात परतणार आहे.