चोपडा – प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे कोळंबा व वडगावसिम शिवारात मागील आठ दिवसांपासून बिबट्याने हैदोस घातला असून आता तर गावाजवळून बकरी, म्हशीचे पारडु व कुत्रे उचलुन घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी बघितले आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकरी, शेतमजूर, गुराखी, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या परिसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडगावसिम येथील पितांबर भिल यांचे शेळीचे पिल्लु व कोळंबा हायस्कूल जवळील एका खळ्यातून कुत्रा व म्हशीचे पारडु बिबट्याने उचलून नेल्याचे बाळू देवराम कोळी यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. शेतकरी अंबादास कोळी हे पिकाला पाणी भरतांना समोरच बिबट्या दिसल्याने त्यांनाही काम सोडावे लागले. एका शेतात मका खुडण्याचे काम करत असताना त्यांच्यासमोरून बिबट्या गेल्याने मजुरांना घरी निघुन जावे लागले. काही गुराख्यांना सुद्धा बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याने येथील दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात मजूर कामाला यायला तयार नाहीत. वडगावसिम येथून शाळकरी मुले कोळंबा येथे जातात. परंतु बिबट्याच्या धाकाने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत बिबट्याला पकडण्यासाठी येथील ग्रामस्थं व शेतकरी सहकार्य करण्यास तयार आहेत. त्याकरिता वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशीही मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे.