फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी
परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून दुसरीकडे नैसर्गिक प्राणवायू मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या वृक्षांची बेसुमार तोड होत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात खिरोदा रस्त्यावरील नगरपालिका पाणी शुद्धीकरण केंद्राजवळ लाकूड तस्करीचा अड्डा झाला आहे. परिसरातील कडुलिंब, बाभूळ, भोकर, वड, पिंपळ या असंख्य वृक्षाची अवैध तोड करून ट्रॅक्टरद्वारे येथे आणली जातात. हातकटर यंत्राच्या सहाय्याने त्यांचे येथेच छोटे-छोटे तुकडे करून येथून अन्य ठिकाणी पोहोच केली जात आहे. या ठिकाणी तसेच धाडी नदी पात्राच्या लगत अनेक ठिकाणी जागोजागी असंख्य मोठमोठे लाकूड आणून बेवारस पडलेली दिसत आहे. या भागाच्या विरुद्ध बाजूस फैजपूर शहरात दक्षिण बाहेर पेठमध्ये वनविभागाचे कार्यालय असून तेथे वनकर्मचारी असतात. मात्र, या सर्व घटनेमागे शासनाच्या वनविभागाचे पगारी अधिकारी डोळस असूनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आज मानवावर ऑक्सिजनचे भले मोठे संकट आहे. मात्र, हेच अधिकारी आर्थिक प्रलोभनापाई मोठमोठे वृक्ष तोडण्याची मूक संमती देत असल्याचे दिसत आहे. वृक्ष तस्करी करणार्यांचा दिवस-रात्र हा गोरखधंदा बिनबोभाट सुरू आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मुळात सातपुडा पर्वत बोडका झाला आहे. आणि आता परिसरातील वृक्ष नामशेष होताना दिसत आहे. याकडे वरिष्ठ लक्ष देतील काय? असा प्रश्न निसर्गप्रेमींना पडत आहे.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या भागात स्वतंत्र दौरा करूनही असंख्य होणारी वृक्षतोड उघड्या डोळ्यांनी बघावी. चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी व याकडे हलगर्जी करणार्या वनविभागाच्या कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.