जळगाव : प्रतिनिधी
भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसा या सामाजिक संस्थेच्या कुलसचिव पदावरुन लेवा समाजामध्ये वादंग निर्माण झाले असून ॲड. संजय राणे यांच्यावर समाजबांधवांकडून गंभीर स्वरुपाचे आरोप करत त्यांना या पदावरुन त्वरीत हटविण्यात यावे, अशी मागणी कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या संदर्भात समाजबांधवांमध्ये मोठा कोलाहल उडाला असून या संदर्भात येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱ्या भोरगाव लेवा पंचायतच्या सभेत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोरगाव लेवा पंचायत हे लेवा समाजाची अग्रणी संस्था असून या पंचायतीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अव्याहतपणे समाजातील समाजबांधवांचे प्रश्न सोडविण्याचे काम होत आहे. पंचायतची कुटुंब नायक ही जबाबदारी परंपरेनुसार पाडळसे येथील पाटील घराण्याकडे आहे. त्यानुसार आजमितीस रमेश विठू पाटील हे कुटुंबनायक आहेत. त्यांच्याबद्दल समाजबांधवांमध्ये निश्चितच आदराची भावना आहे मात्र काही दिवसांपासून पंचायतीच्या कुलसचिवपदी जळगाव येथील ॲड. संजय राणे यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर कुटुंबनायक रमेश पाटील यांच्याकडे समाजातील काही बांधवांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे चित्र समोर येत आहे.
याबाबत वारंवार तोंडी सुचना करुनही याबाबत निर्णय न झाल्याने समाजातील काही नागरिकांनी कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्याकडे थेट ॲड. संजय राणे यांना कुलसचिव पदावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. लेवा समाजातील अरूण बोरोलेंसह समाजबांधवांनी दिलेल्या निवेदनात पंचायतबद्दलची भावना कलुषीत होतांना दिसत असल्याचे चित्र असून समाजात लोक आज उघडपणे पंचायतवर दोषारोप करताना दिसत आहे.
या निवेदनात पंचायतमध्ये असलेल्या कुलसचिव पद हे घटनेत आहे किंवा नाही याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून ॲड. राणे यांची कुलसचिव पदावर केलेली नियुक्ती घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी ॲड. संजय राणे यांच्या विरोधात निवेदन प्राप्त झाले असल्याचा दुजोरा दिला असून सदर नियुक्ती घटनेतील तरतूदीनुसार असल्याचे सांगत प्राप्त झालेल्या तक्रारीवर पंचायतीत ज्येष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कुटुंबनायक हे पद वंशपरंपरेने पाटील घराण्याकडे आहे मात्र कुलसचिवपदी राणे यांची वर्णी लागल्यानंतर त्यांचे आप्तेश कुटुंब नायकांच्या पुढील पिढीविषयी संशयकल्लोळ निर्माण होईल, अशी चर्चा करत आहेत तसेच रमेश पाटील यांचे चिरंजीव ललितदादा यांच्याकडे परंपरेने कुटुंबनायक हे पद येणार असल्यावरही त्यांच्याविषयी अपशब्द वापरले जातांना दिसत आहे. याबाबत समाजामध्ये पुढील कुटुंबनायक आम्हीच राहणार असाही अपप्रचार या माध्यमातून राणे यांच्या आप्तेष्टांकडून केला जात आहे. यामुळे समाजात असलेली मोठी परंपरा कलुषित होत आहे व समाजामध्ये दुही निर्माण होत आहे, अशी भावना समाजातील सुज्ञ बांधवांकडून व्यक्त केली जात असून याबाबत भोरगाव लेवा पंचायतमधील पंच मंडळींनी व कुटुंबनायकांनी कठोर भूमिका घेत निर्णय घ्यावा, असा सूर उमटत आहे.
नियुक्तीशी माझा कुठलाही संबंध नाही ः खडसे
माझी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून ॲड. संजय राणेंशी भेट झालेली नाही, तसेच भोरगाव लेवा पंचायतमध्ये त्यांच्या झालेल्या कुलसचिव पदाच्या नियुक्तीबद्दल माझ्याशी कोणीही चर्चा केलेली नाही, माझा या नियुक्तीशी कुठलाही संबंध नाही. भोरगाव पंचायतीमधील होणाऱ्या नियुक्तीसंदर्भात कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्याशी माझी कुठलीही चर्चा झाली नाही. समाजात एकोपा राहावा, दुही निर्माण होवू नये, यासाठी पंचायतीने समाजबांधवांच्या भावनांचा विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘साईमत’शी बोलतांना दिली.
राणे नियुक्तीवरुन समाजात उमटू लागले पडसाद….
बी.के.चौधरी
भोरगाव लेवा पंचायतीमध्ये झालेल्या कुलसचिव पदाच्या नियुक्तीवरुन पंचायतीचे ज्येष्ठ सदस्य तथा फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष बी.के. चौधरी यांनी ‘साईमत’शी बोलतांना सांगितले की, पंचायतीमध्ये कुलसचिव पद पूर्वीपासूनच होते, मात्र अनेक वर्षापासून हे पद रिक्त होते. सदर पदाच्या नियुक्तीसंदर्भातील अधिकार हे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनाच असल्याने त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत ॲड. राणे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली होती मात्र आता ॲड. राणे यांच्यावर समाजातून होत असलेले आरोप व समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी येत्या 17 तारखेला पंचायतीची सभा होणार आहे. या सभेत आलेल्या निवेदनावर सविस्तर चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.
विष्णु भंगाळे
भोरगाव लेवा पंचायतीमध्ये होणाऱ्या नियुक्त्यासंदर्भात सर्व अधिकार कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांना आहे. पंचायतीचा मोठा नावलौकीक आहे. या वादाबद्दल समाजाची बदनामी न होता चर्चेद्वारे हा वाद मिटला पाहिजे.ॲड. संजय राणे यांच्याकडे कुलसचिव पदाची जबाबदारी 2017 मध्ये समाजाचे महाअधिवेशन होण्यापूर्वी दिली होती.ॲड. राणे संदर्भात आलेल्या तक्रारींची समाजातील ज्येष्ठ नेत्यांनी पडताळणी करुन समाजहित लक्षात घेता योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी मांडले.
सुनिल खडके
समाज पंचायतीचे काम स्वच्छ व एकोप्याने झाले पाहिजे. यासाठी समाजात दुही निर्माण न होता सामाजिक कार्य पार पडले पाहिजे तसेच पंचायतीत जर कुलसचिव पदाची तरतूद नसेल तर ॲड.संजय राणे यांच्या नियुक्तीची घोषणा कुटुंब नायकांनी त्वरीत मागे घ्यावी व समाज बांधवांच्या भावनांचा आदर केला गेला पाहिजे यासाठी ॲड. राणे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीची चौकशी होवून योग्य तो निर्णय लवकरात लवकर देण्यात यावा, अशी प्रतिक्रिया जळगावचे माजी उपमहापौर सुनिल खडके यांनी साईमतशी बोलतांना दिली.
बंडूदादा काळे
सामाजिक काम करत असतांना आक्षेप असल्यास सदर व्यक्तीने आपणहून त्या पदापासून दूर व्हावे हे सामाजिक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे मात्र येथे मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरुपाचे आरोप असल्यावरही ॲड. संजय राणे कुलसचिव पदावर चिकटून आहे. त्यांनी स्वत:हून या पदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर कुटुंबनायकांनी त्यांना या पदावरुन काढून टाकावे, असे माझे परखड मत असल्याचे जळगावचे माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे यांनी व्यक्त केले.