जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवाशी उत्तम रघुनाथ ढोणी वय ३८ यांचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज दि.६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. उत्तमने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केल्यामुळे पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मयत उत्तम हा स्वत:च्या चारचाकी वाहनांमधून प्रवाशी वाहतूक करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता.गावातील ग्रा.पं.सदस्य राजेंद्र काशिकर हे सावकारी करीत असून मयत उत्तमने त्यांच्या कडून व्याजाने पैसे घेतलेले आहे.हलाखीची परिस्थिती असल्यामुळे उत्तम घेतलेले पैसे वेळेवर देऊ शकत नसल्याने काशिकर त्याच्या मागे पैशाचा तगादा लावत होता.दि.५ रोजी गावात आयोजित एका तेराव्याच्या कार्यक्रमात मयत व संशयितांमध्ये जोरदार भांडण झाले त्यावेळी उत्तमला ५ ते ६ जणांनी मारहाण केली. त्यानतर तो घरी न जाता बेपत्ता झाला.घरच्यांनी रात्री त्यांची शोधाशोध केली परंतु तो कुठे आढळून आला नाही.दि.६ रोजी सकाळी गावातील प्रभू उभाळे यांच्या शेतातील बांधावर त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. उत्तमच्या आत्महत्येचा बनाव करण्यात आला असून पैसे देवाण घेवाण करण्यावरूनच त्यांचा खून करण्यात आला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेची माहिती घेऊन व पंचनामा करून मृतदेह जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता रूग्णालयाच्या आवारात मयताच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नातेवाईकांच्या मागणीवरून मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे हलविण्यात आला आहे.
उत्तमच्या शरीरावर जखमा असून त्यांच्या मृतदेहाजवळ विषारी द्रव्य आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई-वडील,भाऊ असा परिवार आहे. उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.के.पाटील यांच्या खबरीवरून पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.