जळगाव/भुसावळ ः प्रतिनिधी
खिरोदा (ता.रावेर) येथील रहिवासी तथा सप्तपुट ललितकला भवन चित्रकला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निलेश एकनाथ वाघ यांना ‘आनंदी गोपाळ’ या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून भारतीय सिनेक्षेत्रातील ६७ वा सर्वोच्च पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळवणारे ते खान्देशातील पहिले कलावंत ठरले. यापुर्वी फेब्रुवारीत त्यांना मुंबई येथे फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे.
संपूर्ण भारतातील विविध प्रांतातून व विविध भाषेतील चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होत असल्याने सिनेसृष्टीत या पुरस्काराला अतिशय मानाचे स्थान आहे.त्यामुळे खिरोदा (ता.रावेर) या क्रांतीभूमीतून पुढे आलेल्या निलेश वाघ यांना ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाच्या उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी (सिनेसृष्टीतील तांत्रिक नाव प्रॉडक्शन डिझाईन,पण प्रचलित नाव आर्ट डायरेक्टर) राष्ट्रीय पुरस्काराची झालेली घोषणा रावेर तालुक्यासाठी सुखद धक्का ठरली आहे. याच चित्रपटाच्या उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी निलेश वाघ यांना यापूर्वी ‘फिल्मफेअर पुरस्कार २०२०’ देखील मिळाला आहे. यानंतर त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल गाठली. या यशाचे श्रेय ते आई-वडील, सप्तपुटचे गुरुजन आणि सहकार्यांनादेतात.
संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, सचिव प्रभात चौधरी आणि प्राचार्य अतुल मालखेडे यांनी या सन्मानाबद्दल नीलेश वाघ यांचे कौतुक केले.
या कारणांमुळे झाली निवड
‘आनंदी गोपाळ’ हा १८८६ च्या काळातील आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टरच्या सामाजिक जीवनावर आधारीत आगळावेगळा चित्रपट आहे. सध्याच्या काळात चित्रपटातील सेट हे कंप्युटर ग्राफिक्स वर्क करून तयार केले जातात. त्यात आर्ट डायरेक्टरचा रोल तसा कमीच असतो. मात्र, ‘आनंदी गोपाळ’चे शुटींग हे मुंबईतील स्टुडिओत करण्यात आले.त्यात १८८६चे सामाजिक जीवन, तेव्हाचे रहाणीमान, आनंदीबाई यांचे लहानपणीचे घर, तेव्हाची रचना तसेच लग्नानंतरचे जीवन, कोलकात्यामधील बाजारपेठ, तेथील तत्कालिन दृश्य असा सर्व वातावरणाचा कृत्रिम सेट हा मुंबईत स्टुडिओमध्ये उभा करण्यात आला. त्यात वाघ यांनी जिवंतपणा आणला. कृत्रिमतेचा स्पर्श होणार नाही, यात ते यशस्वी झाले.