औरंगाबाद : वृत्तसंस्था
गुरुवारी एकाने आपल्या मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. शुक्रवारी दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातील एकाने धारदार शस्त्राने दुसऱ्यावर वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. तर, शनिवारी दुपारी देवगिरी कॉलेजमधील एका विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनांमधून शहर सावरत नाही तोच एका जोडप्याच्या खुनाने शहरात खळबळ माजली आहे.
औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर गल्ली क्रमांक 4 मध्ये एका मंदिरासमोरील इमारतीत ही घटना घडली. येथे राहणाऱ्या कलंत्री दाम्पत्याची हत्या करण्यात आलीय. शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण शामसुंदर कलंत्री असे हत्या करण्यात आलेल्या जोडप्याचे नाव आहे.
कलंत्री यांच्या घरातून दुर्गंध येत होता. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली असता त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी पोलिसांना त्या दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ हे मृतदेह घरात पडून होते. तसेच, हे दोन्ही मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवण्यात आले होते.