एकनाथ खडसेंना लॉटरी ? विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी लवकरच जाहीर होणार

0
18

मुंबई :प्रतिनिधी 

एकीकडे राज्यसभा निवडणुकीच्या  घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकींसाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून कोणते उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवावे याकरिता चाचपणी सुरु झाली आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषद उमेदवारीवर चर्चा करण्याकरिता काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यासंदर्भांत चर्चा झाल्याची माहिती आहे.

 

विधान परिषद निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचा कोणता नेता उतरवावा याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार, यात एकनाथ खडसे यांचं नाव प्राधान्यानं पुढे आलं असून लवकरच नाथाभाऊंच्या नावाची घोषणा केली जाईल. भाजपाला रामराम ठोकत खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर खडसे यांचे राजकीय पुनर्वसन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

विधानपरिषद उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली तर त्यांचे राजकीय पुनर्वसन नक्कीच होणार आहे.

विधानपरिषदेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9जून आहे. त्यामुळे अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीला 27 मतांची आवश्यकता आहे. विधीमंडळात प्रवेश करण्यासाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा प्रस्तावही होता. मात्र ही यादीच दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. आता विधानपरिषदेसाठी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा त्यांना संधी मिळणार का हे पाहावे लागेल.

जर विधानपरिषदेसाठी खडसेंना संधी मिळाली नाही तर त्यांचे समर्थक नाराज होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना विधान परिषद उमेदवारी दिल्याने जळगावमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here