साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेलं आमदारांचं बंड काही थांबता थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक आवाहन केल्यानंतरही शिवसेनेला लागलेली गळती सुरूच आहे. एक एक करून आमदार गुवाहाटीला जाऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटत आहेत. सध्या शिंदे गटात शिवसेना आणि अपक्ष असे ४६ आमदार सहभागी झाले आहेत. आता पर्यंत शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले ४१ आमदार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे १४ आमदार उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही आता आशा सोडली आहे. उद्धव ठाकरे काही वेळातच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेनेने हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांना बंधनमुक्त केले आहे. तुम्हाला आपल्या मतदारसंघात जायचे असेल तर जाऊ शकता, असे फर्मानच शिवसेनेने आपल्या आमदारांना सोडल्याची माहिती पुढे आली आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण ५५ आमदार निवडून आले होते. या आमदारांनी आपल्याच नेतृत्वाविरोधात खदखद व्यक्त केली होती. मुख्यमंत्री कुणालाच भेटत नाहीत असे या आमदारांचे म्हणणे होते. विधान परिषद निवडणुकीनंतर हे आमदार एकनाथ शिंदे
यांच्यासोबत सुरतला गेले. शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला १३ आमदार होते. नंतर हा आकडा वाढून २२ आणि नंतर ३५ झाला. शिंदे यांच्या बंडानंतरही शिवसेनेसोबत काही आमदार होते. गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, दीपक केसरकर आणि मंगेश कुडाळकर हे आमदारही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेना अधिकच कमकुवत झाली आहे.
आपले आमदार फूट पडू नये म्हणून शिवसेनेने ज्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले होते तेही आमदार काहीना काही बहाणा करून शिंदे यांना जाऊन मिळत आहेत. गुलाबराव पाटील यांनी तर आजारी असल्याचा बहाणा केला. जळगावला जात असल्याचे सांगितले होते. ते जळगावलाही गेले. नंतर तिथून त्यांनी थेट गुवाहाटी गाठली. त्यामुळे आपले आमदार आता आपल्या हातात नाहीत याची जाणीव ठाकरे यांना झाली आहे. शिवाय ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून आता सत्तेत राहायचे नाही, असा निर्णयच घेऊन टाकला आहे. त्यामुळेही त्यांनी उरलेल्या आमदारांना मतदारसंघात जायचं असेल तर जा, असा निरोप पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.