उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या: रामदास आठवले

0
10

महाविकास आघाडीने उमेदवार उभा केल्यानेच भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. धनंजय महाडिक यांचा विजयही झाला. या निवडणुकीत अपक्षांची मते ही भाजपच्या पारड्यात पडली असून त्यामुळे महाविकास आघाडीचा मोठा अपमान झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडले पाहिजे
‘उद्धव ठाकरेंना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीत प्रयत्न करूनही महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते रविवारी मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. ही सरकारसाठी मोठी नामुष्की आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसेल, असे भाकीत रामदास आठवले यांनी वर्तविले.
महाविकास आघाडीने उमेदवार उभा केल्यानेच भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. धनंजय महाडिक यांचा विजयही झाला. या निवडणुकीत अपक्षांची मते ही भाजपच्या पारड्यात पडली असून त्यामुळे महाविकास आघाडीचा मोठा अपमान झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडले पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले. यावर आता शिवसेनेचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल रणनीतीमुळे भाजपने संख्याबळ नसतानाही विजय खेचून आणला होता. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक असा सामना रंगला होता. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांचे अचूक व्यवस्थापन केल्याने धनंजय महाडिक विजयी झाले होते.
‘मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाहीत; अजितदादांना पहाटे ५ वाजता फोन केल्यावर ७.४५ ला भेटायला बोलावलं’
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे सरकारची कसोटी
राज्यसभा निवडणुकीतील यशानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काहीच अशक्य नाही, असा आत्मविश्वास भाजपच्या गोटात आहे. देवेंद्र फडणवीस विधानपरिषद निवडणुकीतही असाच चमत्कार करुन भाजपच्या चारऐवजी सहा जागा निवडून आणतील, अशी चर्चा रंगली आहे. भाजपने पाच अधिकृत उमेदवार व सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ज्याअर्थी भाजपने या उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे, त्याअर्थी फडणवीस आणि भाजपने त्यादृष्टीने तयारीही केली असेल, असे बोलले जाते. मात्र, विधानपरिषदेत भाजपच्या सहा जागा निवडून आल्यास हा ठाकरे सरकारसाठी सर्वात मोठा धोका असेल. कारण, असे घडल्यास ठाकरे सरकार आपसूकच अल्पमतात जाईल. त्यामुळे आता ठाकरे सरकार विधानपरिषद निवडणुकीत कमबॅक करणार का, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here