जळगाव ः प्रतिनिधी
येथील लाइफ इज ब्युटिफुल फाउंडेशन आयोजित मल्हार हेल्प फेअर-4 प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी जळगावकरांनी प्रचंड उत्साहाने आपला सहभाग नोंदवत सेवाकार्याच्या कुंभमेळ्याला निरोप दिला. या माध्यमातून सेवा आणि सदाचाराचा एक सोहळाच जणू जळगावकरांनी अनुभवला. समारोप कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा संस्था व स्वच्छतादूतांचा सन्मान करण्यात आला. फेअरमध्ये यंदा एकूण 60 समाजसेवी संस्था व 26 सेवा महर्षी फेअरमध्ये सहभागी झालेत.
सोमवारी समारोप कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ॲड. ललिता पाटील, डॉ. केतकी पाटील, मिस मल्टिनॅशनल तन्वी मल्हारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष विजय जाधव हे होते. हेल्प-फेअरचा परिचय देणारी फिल्म दाखवण्यात आली. प्रास्ताविक गनी मेमन यांनी केले. कार्यक्रमात डॉ. हेगडेवार सेवा समिती, जनमानवता संस्था, पशुपापा संस्था, कोरोना काळात अविरत सेवा देणारे इंडियन रेडक्रॉस सोसायटी व गोदावरी फाउंडेशन या संस्थांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येऊन सत्कार करण्यात आला.
तर स्वच्छतेतून निरोगी समाज घडवणारे आनंद सपकाळे, अंजली कंडारे, भगवान कंडारे, कन्हैया लोंढे, संदीप बिऱ्हाडे यांना स्वच्छतादूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय फेअर साकारण्यासाठी परिश्रम घेणारे मोटेल कोझी कॉटेज, मनोज डोंगरे, निखिल शिंदे यांनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.