जळगाव ः प्रतिनिधी
पर्यावरणाच्या रक्षणासाठी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे ‘प्लास्टिक द्या, प्रदूषण वाचवा’चा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे टाकाऊ प्लास्टिक पुनर्वापराच्या कामाला चालना मिळाली आहे.
घरांमधील प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या पर्यावरणाच्या प्रदूषणालाही कारणीभूत ठरत आहे. प्लास्टिक नष्ट होत नाही, मग या प्लास्टिकचे करायचे काय? हा प्रश्न सर्वांसमोर आहे. कॅरी बॅग, मॅगी, बिस्कीट, कुरकुरे, कॅडबरी, चिप्स रॅपर, पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, फूड पॅकिंगच्या प्लास्टिक पिशव्या यांची विल्हेवाट लावणे देखील कठीण होते. असा कचरा जनावरांच्या पोटातही जातो. हा कचरा सुपीक जमीनही खराब करतो तसेच प्लास्टिक जाळल्याने विषारी वायूही बाहेर पडतो. त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अशा प्लास्टिकची विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचे आहे.
पर्याय म्हणून केला प्रयत्न
पर्याय म्हणून शहरातील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट या संस्थेने या सर्व प्लास्टिकचा जळगावातच पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे जळगावच्या भूमीवर प्रदूषित होत असलेले पर्यावरण आपण वाचवू शकतो या संकल्पनेने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पर्यावरणाला मोठी मदत
26 जानेवारीपासून संपूर्ण जळगाव शहरात विविध माध्यमातून लोकांकडून कचरा प्लास्टिक गोळा करण्यात आले. ते प्लास्टिक पुनर्वापरासाठी कारखान्यात पाठवण्यात आले गेले. तेथे तो प्लास्टिक कचरा मशीनद्वारे क्रश करण्यात आला. ते प्लास्टिक क्रश सिमेंट व इतर साहित्यात मिसळून शुद्ध जीआरसी ब्लॉक बनवताना वापरण्यात आला. त्यामुळे पर्यावरणाचा विकास व संरक्षण होण्यास मदत होणार आहे.



