गतविजेत्या भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेत कास्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. कोरियाने बरोबरीत रोखल्याने अंतिम फेरीची संधी हुकलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात जपानवर १-० असा विजय मिळवला . सामन्यातील एकमेव गोल राजकुमार पाल ह्याने पहिल्याच क्वार्टरमध्ये केला. उत्तम सिंग ह्याने उजव्या बाजूने दिलेल्या कट बॅक पासवर त्याने ही संधी साधली.
त्यानंतर भारताने चेंडूचा ताबा आपल्याकडे ठेवत स्वत:ला सुरक्षीत राखले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये तीन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना एस.व्ही.सुनील ह्याने गोलची शक्यता निर्माण केली होती परंतु तो यशस्वी ठरला नाही तर जपानने लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर वाया दवडल्याने त्यांची बरोबरीची संधी हुकली.
ह्या स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी मंगळवारी कोरियावर विजय आवश्यक होता पण त्यात ते असफल ठरले आणि सामना ४-४असा बरोबरीत सुटल्याने भारतीय संघाला तिसऱ्या व चौथ्या स्थानाचा सामना खेळावा लागला. त्यात मात दिलेल्या जपानला भारतीय संघाने आधीच्या सामन्यातही २-१ अशी मात दिली होती.
भारतीय संघ आपल्या विजेतेपदाचे रक्षण करु न शकल्याची निराशा असली तरी ह्या संघात बरेच खेळाडू नवोदीत होते, अनुभवी खेळाडू हया संघात फारसे नव्हते, हे ध्यानात घ्यायला हवे.