आवश्यक वैद्यकीय साधन सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही

0
17

पाचोरा ः प्रतिनिधी
पाचोरा- भडगाव मतदार संघात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात काल दुपारी ३.३० वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.
या प्रसंगी त्यांनी पाचोरा व भडगाव शासकीय रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साधन सुविधांसाठी किती निधी लागतो त्याची माहिती घेत त्वरित साहित्य खरेदी करून गोरगरीब रुग्णांना चांगला उपचार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही , सोबतच अधिकारी, कर्मचारी व डॉक्टर्स बांधवानी देखील पहिल्या टप्यात केलेल्या कामा प्रमाणेच यंदा दुसर्‍या टप्यात देखील झोकून देत काम करण्याचे आवाहन केले.मात्र जनतेनेही आपली जबाबदारी ओळखत शासन नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असा इशारा दिला.
त्यानंतर त्यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांशी संवाद साधत तब्बेतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.याठिकाणी उपलब्ध असलेल्या सोळा बेडस् व्यतिरिक्त पुन्हा नवीन सुमारे १८ ऑक्सिजन पुरवता येईल असे बेड निर्माण करण्याचे निश्‍चित करत त्याचे त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, पोलीस उप निरीक्षक गणेश चौभे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे, भडगावचे डॉ.प्रशांत पाटील, डॉ.भूषण मगर,नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, संभाजी पाटील, श्री.सोनार, अभिजीत येवले,भडगाव पालिकेचे परमेश्‍वर तावडे,स्वीय सहाय्यक राजेश पाटील, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाचोरा उपविभागात असलेल्या प्रशासकीय कामांची माहिती दिली तर डॉ. समाधान वाघ, डॉ. अमित साळुंखे यांनी पाचोरा व डॉ प्रशांत पाटील यांनी भडगाव तालुक्यात सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती दिली.सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले लसीकरण, तपासणी कीट, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींबाबत त्यांनी माहिती घेतली.तसेच पाचोरा व भडगाव नगरपालिका हद्दीत घरोघरी जाऊन तपासणी करणे कामी टीमची निर्मिती करणेबाबत त्यांनी सूचना दिल्या. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी विविध सूचना करत ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समित्यांसह पोलीस पाटील बांधवांना खबरदारी घेत अशा ठिकाणी प्रसंगी दंडात्मक कारवाई करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागात वैद्यकीय उपचार करणार्‍या डॉक्टर्सनी शहरात विविध कोविड केअर सेंटर मध्ये वा ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावण्याचे आवाहनही आ.पाटील यांनी केले.
जादा भाव घेणार्‍यांची तक्रार करा
पाचोरा उपविभागातील काही हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांकडून विविध प्रकारचे सिटी स्कॅन,रक्त चाचण्यांचे रिपोटर्स ,रुग्णवाहिका, रेमेडिसिव्हर सह काही इंजेक्शनची शासनाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा चढ्या भावाने विक्री वा तपासण्या होत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त होत असून याबाबत कोणाची काही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांचेकडे तक्रारी करण्याचे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.याबाबतचे शासनाने निर्धारित केलेले दर पुन्हा एकदा जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here