आरबीआयने (RBI)एचडीएफसीला (HDFC Bank)आपल्या ग्राहकांना नवीन क्रिडिट कार्ड (Credit Card)देण्यास मनाई केली आहे. हा एचडीएफसी या खासगी बँकेला मोठा धक्का मानला जात आहे. आरबीआयने एचडीएफसीच्या डिजीटल २.० या अंतर्गत सुरु केलेल्या सर्व डिजीटल अॅक्टिव्हिटी थांबवण्यास सांगितल्या आहेत. यात ग्राहकांना नवीन क्रेडिट कार्ड देण्याचाही समावेश आहे. आरबीआयने हे आदेश २ डिसेंबरला एचडीएफसी बँकेला दिले.
आरबीआयने हा निर्णय एचडीएफसी बँकेच्या गेल्या २ वर्षात इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमध्ये सातत्याने आलेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. यात २१ नोव्हेंबरला एचडीएफसीच्या प्रमुख डाटा सेंटरमधील पॉवर फेल्युअरचाही सामावेश आहे. यामुळे बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये व्यत्यय आला होता.
आरबीआयने आपल्या आदेशात बँकेच्या संचालक मंडळाला आपल्या त्रुटी शोधून जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले. ही बंदी तात्पुरत्या स्वरुपाची असणार आहे. पण, ही बंदी शशीधर जगदीशन यांची एचडीएफसीच्या सीईओपदी निवड झाल्यानंतर दोनच महिन्यात घालण्यात आली आहे. त्यांच्याकडून डिजीटल बँकिंगकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा आहे.