जळगाव ः प्रतिनिधी
आरटीई अर्थात खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना 19 ते 27 मे दरम्यान प्रवेश निश्चितीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र प्रतीक्षा यादीतील एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित न झाल्याने शिक्षण विभागाच्या माध्यमातून 3 जूनपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दरवर्षाप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे.
यंदा जिल्ह्यातील 285 शाळांतील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जाते आहे.त्यानुसार 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी तर 2399 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील 2940 पैकी 2173 विद्यार्थ्यांनी मुदतीअंती प्रवेश निश्चित केला असून उर्वरित विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचले नाही. प्रतीक्षा यादीतील बालकांना 19 मेपासून प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत एकही प्रवेश झाला नाही. अखेर पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता 3 जूनपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. पालकांनी पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती पाहून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे.