आमदारांचे विशेष प्रयत्न, २ कोटी ४७ लाख निधी मंजूर

0
46

अमळनेर ः प्रतिनिधी
तालुक्यात २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या ५२ गावातील शेतकर्‍यांना टप्प्याटप्प्याने न्याय मिळवून देण्यात यश मिळत असल्याचे समाधान असून आता पुन्हा लाभापासून वंचित जुलै ते ऑगस्ट २०१९ मधील बाधित १५ गावांतील शेतकर्‍यांना पीक कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सतत पाठपुरावा करून २ कोटी ४७ लाख ६३ हजार निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली.
विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात फक्त अमळनेर आणि यावल या दोनच तालुक्यांना हा लाभ मिळाला असून या गावातील शेतकर्‍यांना खरीप हंगाम पीक कर्जापोटी एक हेक्टर मर्यादेपर्यंत कर्जाची रक्कम आणि ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत संपूर्ण व्याज शासन माफ करणार आहे. कर्जमाफीबाबत शासन आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. याआधी आ.पाटील यांनी जुलै ते ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित पाच गावांना हा लाभ मिळवून दिला असून आता १५ गावांतील शेतकर्‍यांना लाभ मिळवून दिल्याने शेतकरी बांधव समाधानी झाले आहेत.
दरम्यान, २०१९ साली जुलै ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी झाल्याने उद्भवलेल्या पुरपरिस्थितीत बाधित शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे संकेत मिळाले होते. नुकसानीचा पंचनामा महसूल विभाग व कृषी विभाग यांनी केलेला होता. या दोन्ही विभागाच्या याद्या मागवून सहाय्यक निबंधक कार्यालय अमळनेर यांनी सुटीच्या दिवशी देखील कामकाज करून लेखा परीक्षक अमळनेर कार्यालय यांच्याकडून लेखा परिक्षण करू या याद्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेद्वारे अद्ययावत करून प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
या पिडित शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार अनिल पाटलांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून, महसूल, कृषी, सहाय्यक निबंधक कार्यालय आदी विभागांशी सतत संपर्क ठेवला. त्याचेच फलित म्हणून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी झाले असून मंजुरी बद्दल आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडी शासनासह या प्रक्रियेत विशेष सहकार्य करणारे अमळनेर महसूल विभाग, कृषी विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय अमळनेर, लेखा परीक्षक अमळनेर कार्यालय, जिल्हा बँकेमार्फत प्रस्ताव पाठवला असल्याने बँक प्रशासनाने या सर्वांचे विशेष आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here