जळगाव : प्रतिनिधी
२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे छातीठोकपणे सांगणारे देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी कासावीस झाले आहे, मात्र आता ते पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत, असा चिमटा राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी काढला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी जळगाव येथे येणार आहे. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, कैलास पाटील, मनीष जैन आदी उपस्थित होते. यावेळी खडसे म्हणाले, मागील अडीच वर्षांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे. त्यामुळे विरोधक सरकारवर सतत आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आघाडीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे.
ते पुढे म्हणाले, मी देखील विरोधी पक्षनेता होतो. आपण सरकारवर आरोप केले परंतु व्यक्तीगत वैर केले नाही. सध्या सत्ता मिळवण्यासाठी विरोधकांकडून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. भाजपचे नेतेएसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून आंदोलनाला आणखी चिघळवण्याचे प्रयत्न करत आहेत. मी पुन्हा येईलच्या नादात देवेंद्र फडणवीस खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे जनतेने आता तुम्हाला नाकारले आहे. आता ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असा चिमटाही त्यांनी काढला.
