मुंबई : NACL घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. उद्या प्रताप सरनाईक यांनाही अटक होऊ शकते, असा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. प्रताप सरनाईक यांना अनेकवेळा समन्स बजावले होते. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ईडीने (ED) ही कारवाई केल्याचे आता समजते.
अटक करणार…
प्रताप सरनाईक यांच्या ११.३५ कोटींच्या मालमत्ते जप्तीबाबत किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या साथीदाराने एनएसीएल घोटाळ्यात २१६ कोटींचा घोटाळा केला आहे. ३५ कोटी सरनाईकांच्या बँक खात्यात आले होते. या पैशातून त्यांनी टिटवाळ्याची जमीन घेतली होती. त्यामुळेच आज ईडीने ही कारवाई केली आणि ११.३५ कोटींची मालमत्ता अटॅच झाली. ही कारवाई इथेच थांबणार नाही. उद्धव ठाकरेंनी कितीही माफ केले तरी किरीट सोमय्या थांबणार नाहीत. आज मालमत्ता जप्त झाली. त्यानंतर प्रताप सरनाईक यांना कधीही अटक होऊ शकते, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
२०१३ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. ५ हजार ६०० कोटींची टर्नओव्हर असलेल्या आणि १३ हजार गुंतवणूकदार असलेल्या या कंपनीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. वेगवेगळ्या मार्गांनी चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवले जातात. या प्रकरणी ईडीने पीएमएल कायद्यान्वये मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने २५ डिफॉल्टर्सचा शोध लावला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.