औरंगाबाद : प्रतिनिधी
पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला अनेक महिलांना बळी पडावं लागतं. घरगुती हिंसाचाराच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल आहेत, मात्र कित्येक तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्याही नसतील. या वास्तवाची दुसरी बाजू दाखवणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बायकांकडून होणाऱ्या नवरोबांच्या छळाची . पत्नी पतीचा छळ करत असल्याच्या तब्बल 285 तक्रारी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. हा आकडा फक्त गेल्या वर्षभरातील आहे. त्यामुळे बायको-सुनांवरील अत्याचाराच्या घटना उजेडात येत असताना नवऱ्यांवरही अन्याय-अत्याचार वाढत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे नवरा-बायकोमध्ये तक्रारी आणि वादाचे प्रमाण वाढल्याचं बोललं जात आहे.
वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे यासाठी वडाच्या झाडाला सात फेरे मारण्याची परंपरा आहे. मात्र राज्याच्या काही भागात वडाला उलटे फेरे मारुन पत्नीपासून सुटका करण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या नवऱ्यांच्या बातम्याही अलिकडच्या काळात येऊ लागल्या आहेत. पुरुष हक्क संरक्षण समितीने अशा पतींसाठी पुढाकार घेतला आहे. गंमतीचा भाग सोडला, तर काही पतीदेवांना आपल्या बायकोचा जाच होत असल्याचं धक्कादायक सत्य उघडकीस आलं आहे.
बायका नवर्यांच्या छळ करत असल्याच्या तब्बल 285 तक्रारी औरंगाबादमध्ये दाखल झाल्या आहेत. पत्नीने केलेल्या छळाच्या इतक्या प्रमाणात तक्रारी गेल्या वर्षभरात महिला सहाय्य कक्षाकडे नोंदवण्यात आल्या आहेत. महिलांवर अन्याय-अत्याचार होत असताना आता नवऱ्यावरही अन्याय-अत्याचार वाढले आहेत.
अर्थात, महिलांवरील घरगुती हिंसाचाराचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. पतींच्या तक्रारींच्या तुलनेत पत्नींनी केलेल्या तक्रारीही अजूनही जास्तच आहेत. किंबहुना पाच ते सहापटच आहेत. कारण बायकांनी आपल्या पतीविरुद्ध केलेल्या 1794 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मोबाईलमुळे नवरा-बायकोमध्ये तक्रारी आणि वादाचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे.