चोपडा ः प्रतिनिधी
धरणगाव येथे सहा व आठ वर्षाच्या अल्पवयीन बालिकांवर चंदुलाल शिवराम मराठे नामक नराधमाने अत्याचार केला. त्या अत्याचारी नराधमांचा निषेध करण्यासाठी प्रदेश तेली महासंघ, जळगाव तसेच चोपडा तालुका समस्त तेली समाजातर्फे पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीकरीता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदार अनिल गावीत यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात सदरचा खटला अति जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा व अत्याचारी नराधमाला फाशिची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह पिडीत कुटुंबाला संरक्षण द्यावे, दोन्ही बालिकांचा भविष्यातील शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, भविष्यात दोन्ही बालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे तसेच बालिकांना प्रत्येकी एक कोटी रुपये द्यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार अनिल गावीत यांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देत नराधमाचा निषेध करण्यात आला.
यावेळी प्रदेश तेली महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष के. डी.चौधरी, चोपडा तालुकाध्यक्ष प्रशांत चौधरी, चोपडा तालुका महिला अध्यक्षा सीमा सुनील चौधरी, उपाध्यक्षा योगिता शशिकांत चौधरी, चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष टी.एम. चौधरी, विश्वस्त चौधरी, देवकांत चौधरी, सुनील चौधरी, अनिल चौधरी, प्रकाश चौधरी, आबा चौधरी, राजू चौधरी, गोपीचंद चौधरी, सुनील चौधरी आदिंसह अनेक समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार गावित यांनी वरिष्ठांकडे मागण्यांचे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.