अर्थसंकल्पात घोषणा मोठ्या मात्र सामान्य जनतेची घोर निराशा

0
20

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने कोरोना संकटात केलेल्या मदतीची माहिती देतांना लवकरच करोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे तसेच पहिल्यांदाचा पेपरलेस बजेट सादर केले गेले त्यात मेक इन इंडिया टॅबचा वापर केला गेला आहे.किमान वेतन कायदा सर्व क्षेत्रांमध्ये लागू करण्यात येणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.त्यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाची आठवण करून दिली…‘ज्यावेळी पहाट अंधारलेली असते त्यावेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो’
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत २०२१-२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.त्यांनी बजेट दरम्यान ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी पुढील सहा वर्षांसाठी ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या योजनेंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत.
उज्ज्वला योजनेचा विस्तार
उज्ज्वला योजना १ कोटी अजून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार. गॅस वितरण नेटवर्कमध्ये पुढील तीन वर्षात अजून १०० जिल्हे जोडणार आहोत. जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाइपलाइन प्रोजेक्ट सुरु केला जाईल अशी ग्वाही निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.असंघटित मजुरांसाठी ऑनलाइन पोर्टल तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतमालाला दीडपट हमीभाव
आमचे सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे.शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दीष्ट असून गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या.२०१२ मध्ये शेतकर्‍यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, २०१५ मध्ये शेतकर्‍यांना ५२ हजार कोटी रुपये दिले तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटी वाढला. गव्हाचे उत्पादन घेणार्‍या ४३ लाख शेतकर्‍यांना फायदा झाल्याचा दावा त्यांनी
केला.
शेतकर्‍यांचा उल्लेख येताच विरोधकांचा गदारोळ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकर्‍यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.यावर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के करणार असल्याचीही त्यांनी स्पष्ट केले.
सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेटचे वाचन करत असताना शेअर बाजाराकडून बजेटचे स्वागत केले जात असल्याचे चित्र आहे. सकाळी बाजार उघडताच ४०१ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स आता ८०० अंकांनी वधारला आहे.
जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी
निर्मला सीतारामन यांनी जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी जाहीर केली आहे. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी माहिती त्यांनी
दिली.
रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद
२०३० पर्यंत हायटेक रेल्वेचे लक्ष्य डोळ्यांसमोर असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी १.१० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाइनचा विस्तार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कापड उद्योगासाठी मेगा टेक्सटाइल इन्व्हेस्टमेंट पार्क्स उभारणार असून आवश्यक सर्व सुविधांसह येत्या तीन वर्षात सात टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब
देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्यासाठी तरतूद केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली असून १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्रे आणि दोन मोबाईल हॉस्पिटल्सची घोषणा करण्यात आली आहे.
आत्मनिर्भर भारत पॅकेजचा उल्लेख
आत्मनिर्भर भारत पॅकेजेसमुळे जो आर्थिक सकारात्मक परिणाम झाला तो २७.१ लाख कोटी रुपयांचा म्हणजे जीडीपीच्या १३ टक्क्यांपेक्षा जास्त होता असा उल्लेख निर्मला सीतारामन यांनी आवर्जून केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात ऐतिहासिक विजय मिळत कसोटी मालिका जिंकल्याचा दाखलाही दिला.त्यांनी यावेळी करोना संकटात केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. आत्मनिर्भर पॅकेजचाही त्यांनी उल्लेख केला. करोना संकटात सरकारने गरजूंना मदतपुरवठा केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकर्‍यांना भरीव मदत मिळेल.
‘‘बजेट कितीही मोठे असले तरी नेत्याचा एक अंदाज असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकर्‍यांना सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. यातूनच शेतकर्‍यांना भरीव मदत मिळेल अशी मला अपेक्षा आहे.तसेच मध्यमवर्गाची अपेक्षा पूर्ण करणारे बजेट असेल असे मला वाटते,‘‘ असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
आणखी दोन लस देखील लवकरच
आज भारताकडे दोन कोरोना लस उपलब्ध असून फक्त आपल्याच नाही तर अनेक देशातील नागरिकांची कोरोनाविरोधात सुरक्षा केली जात आहे. आणखी दोन लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाहीच
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती.याशिवाय कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.तसेच ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली असून सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला नाही.
पहिल्या डिजिटल जणगणनेची घोषणा
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली डिजिटल जणगणना करण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे असेही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
अर्थसंकल्पातील काही वैशिष्ट्ये
* उद्यापासून पेट्रोलवर २.५० रू. तर डिझेलवर ४ रू. कृषी अधिभार
* जुनेच आयकर स्लॅब कायम राहणार
* इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही
* फक्त ७५ वर्षावरील नागरिकांना सवलत
* १० कोटीपर्यंतच्या उलाढालीला ऑडीट नाही
* सोने – चांदी स्वस्त होणार
* आयात शुल्क वाढणार
* भुसावळ – खरगपूर मालवाहतूक कॉरीडॉर
* प्रवासी मजुरांसाठी अन्न सुरक्षा योजना
* श्रमिकांसाठी किमान वेतन योजना
महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा
महाराष्ट्रासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
एलआयसीच्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब
आयुर्विमा क्षेत्रातील एलआयसी सध्या १०० टक्के सरकारी मालकीची कंपनी आहे.भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा (आयपीओ) निर्गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी भारत सरकार निर्गुंतवणीकरण करणार्‍या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल असे स्पष्ट केले आहे.याचप्रमाणे आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्यासंदर्भातील घोषणाही निर्मला यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here