पुणे : वृत्तसंस्था
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असताना राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची घोषणा करण्यात आली आहे. मे महिन्याअखेर राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्याचे शहराध्यक्ष बदलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत.
तसेच औरंगाबादच्या सभेनंतर अयोध्याची तयारी सुरु असताना भाजप खा. ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना माफीनामा सादर करण्याचे सांगितले होते. यावर मनसेच्या कुठल्याही प्रवक्ते यांनी कुठलीही ठोस भूमिका मांडली नाही त्यांनी यासंदर्भातील सर्व विषय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच मांडतील अशी भूमिका घेतली होती. आता पुण्यामध्ये होणाऱ्या सभेत राज ठाकरे त्या भाजप खासदार यांचा चांगलाच समाचार घेतील का ? याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून आहे.
वसंत मोरे यांना शहराध्यक्षपद सोडावं लागल्यानंतर त्यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे. या पक्षांतर्गत गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे पुण्यात आल्याचं सांगितलं जातंय. आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. मेअखेर होऊ घातलेल्या सभेच्या तयारीचाही ते आढावा घेतील.
गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात मनसेचे तब्बल 28 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे शहरातील ताकद आणखी वाढवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न राहील. शिवाय अयोध्या दौऱ्याआधी ही सभा होते आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिलाय. याबाबत राज ठाकरे काही भाष्य करतात का, याचीही उत्सुकता सर्वांना असेल. मात्र राज ठाकरेंचं मुख्य उद्दिष्ट असेल ते पुण्यात सत्तेच्या अधिकाधिक जवळ पोहोचण्याचं.