मुंबई : प्रतिनिधी
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगिती झाल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सकाळपासून अयोध्या दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. दौरा रद्द करण्यामागील कारण राज ठाकरे यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. पुण्यात २२ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे मनसैनिकांसमोर याबाबत स्पष्टीकरण देतील. पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राच्या सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.