अमळनेर ः प्रतिनिधी
शहरातील प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना व वाहनधारकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी छोटे-मोठे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा रस्ता त्वरीत दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील पंकज चौधरी यांनी दिला आहे.
अमळनेर रा.मा.१५ चे काम सुरू होते. त्यामुळे शहरातून जाणारा रा.मा. क्रं.०६ (प्रबुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत) रस्त्यावरून सर्व अवजड वाहतूक वळविल्याने रा.मा.०६ ची संपूर्ण चाळण झाली आहे. विशेष करून सुभाष चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत धुळीचे वातावरण होऊन प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाच्या त्रासाच्या तक्रारीत वाढ झाल्याचे समजते. त्यास अनुसरून जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी व तरुण मित्र परिवाराने दि.१ डिसेंबर २०२० रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद यांना निवेदन देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली होती. प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने दि.०४ डिसेंबर २०२० रोजी तरुण मित्र परिवार रास्ता रोको करणार असल्याचे जाहीर केले होते. शहरात एकमेव रस्ता सुरू असल्याने रस्ता रोको केल्यास मोठी गैरसोय होईल व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव व पोलीस निरीक्षक आंबदास मोरे यांनी तूर्त आंदोलन करू नये म्हणून मध्यस्ती करत नगरपरिषदेस योग्य मार्ग काढण्यासाठी आव्हान केले होते. त्यास अनुसरून जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांना मुख्यधिकारी विद्या गायकवाड यांनी येत्या चार दिवसात या रस्त्याची पाहणी करून डागडुजी करण्याचे आश्वासन दिले होते. तरी दि.१० जानेवारी २०२० पर्यंत कुठलीही प्रगती न झाल्याने व आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न केल्याने प्रशासनाचा निषेध करणार असल्याचे सांगितले.
या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे पंकज चौधरी यांनी घोषित केले आहे. त्यामुळे नगरपरिषदेसमोर व सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय ढेकू रोड येथील कार्यालयासमोर प्रशासनाचा निषेध करत काळे झेंडे व कुंभकरणाची झोप घेतलेले व्यंग चित्राचे फलक तरुण कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
त्यास अनुसरून आज काळे फटके घालून प्रशासनाचा दिरंगाई व हेतूपुरस्कर दुर्लक्षाबाबत मुख्याधिकार्यांना निवेदन देत तरुणांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकार्यांनी या रस्त्याच्या कामास जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळाली असून तांत्रिक अडचणीमुळे वेळ लागत आहे. तरी तात्पुरती गैरसोय दूर व्हावी म्हणून डांबरीकरणाचे पँच (खड्डे बुजवणे)साठी आठ दिवसाच्या आत काम करून देण्याचेे आश्वासन दिले आहे. येत्या आठ दिवसाच्या आत डागडुजी (खड्डे बुजवणे) करण्यात येईल, असा विश्वास आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्यासमक्ष मुख्याधिकार्यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी व तरुण मित्र परिवारास दिला.
याप्रसंगी बाळासाहेब संदानशिव, हरिश्चंद्र पाटील, किरण बागूल, पराग चौधरी, गणेश पाटील, शंकर देसले, ब्रिजलाल पाटील, प्रवीण विसपुते, सुनील चौधरी, प्रशांत पाटील, चेतन पाटील, रुणाल पाटील, जयेश चौधरी, सोनू ढिवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.