अमळनेर ः प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसी-आय) सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. सीए नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अमळगाव येथील सारिका मंगेश झंवर हिने पहिल्याच प्रयत्नात ६० टक्के गुण मिळवून अमळगाव परिसरात पहिली महिला सीए होण्याचा मान मिळवला.
सारिकाने मुंबई येथील सिडनॅम कॉलेजमध्येे ‘बी.कॉम’चे शिक्षण पूर्ण केले असून सीए परीक्षेची त्यादरम्यान ती तयारी करत होती. सारिकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमळनेर येथे पूर्ण केले होते. इयत्ता १० वीमध्ये ती ९५ टक्के गुण मिळवून डी.आर.कन्या शाळेतून द्वितीय क्रमाकाने उत्तीर्ण झाली होती. तर १२ वीला जळगाव येथील एम.जे.कॉलेजमध्ये ९१ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यात ती उत्तीर्ण झालेली होती.
अमळगाव येथील व्यावसायिक मंगेश झंवर यांची सारिका कन्या आहे. घरात व्यावसायिक वातावरण असल्याने त्यापासून प्रेरित होऊन लहानपणापासून तिला या क्षेत्रात आवड निर्माण झाली होती. या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.