फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या धाडी नदी सुशोभीकरण कामातील रस्त्याचे सहा महिन्यातच बारा वाजले आहे. हा रस्ता ठीकठिकाणी उखडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगरपालिकेला सुमारे अडीच ते तीन कोटी रक्कम धाडी नदी पात्र सुशोभीकरण करण्यासाठी दिले गेले होते. हे काम २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. या कामांतर्गत धाडी नदीच्या काठावर संरक्षण भिंत व श्रीराम टाकी ते लक्कड पेठ नजीक खिरोदा रस्ता असे कॉंक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण होऊन सहा महिनेच झाले मात्र हा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून उखडलेल्या परिस्थितीची आज अवस्था झाली आहे. हाच रस्ता श्रीराम टाकी समोर अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. किमान हा रस्ता पुढील पाच वर्ष टिकणे आवश्यक आहे. हे काम शासनाने मंजूर केलेल्या इस्टिमेट नुसार झालेलं नसल्याने या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या कामांमध्ये माती मिश्रित वाळू, सिमेंटचा अल्प वापर आणि खडी आसारीचे कमी प्रमाणात वापर होत असल्याने या बोगस कामाचे वृत्त त्यावेळी साईमत दैनिकाने सडेतोड शब्दात वृत्त प्रसिद्ध केले होते ते वृत्त आज खरे ठरत आहे. अनेकांनी याबाबत शासन स्तरावर तक्रारी सुध्दा दाखल केल्या होत्या. या कोट्यावधी रुपयांच्या बोगस कामाला जबाबदार कोण ? संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याची सहा महिन्यातच दयनीय अवस्था झाली आहे.