सोयगाव : विजय चौधरी
जरंडी शिवारात एकापाठोपाठ एक दोन बिबटे अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यानंतर पाहिल्या नर बिबट्याचा दि.२३ मृत्यू झाल्यानंतर दुसर्याच दिवशी दि.२४ मादि बिबट्या अत्यवस्थ अवस्थेत आढळला होता.परंतु उपचारासाठी वेताळ वाडीच्या रोपवाटिकेत दाखल असलेल्या या मादी बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतल्याने सोयगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
जरंडी शिवारात दि.२४ पहाटे एका शेतात मादी बिबट अत्यावस्थ स्थितीत असल्याची माहिती वनविभागास मिळाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील परिस्थितीवरून लगेचच रेस्क्यू टीम व डॉक्टरांना सूचित करण्यात आले व वनाधिकाऱ्यांनी बिबट्यास उपचाराकरिता लगेच वेताळवाडी रोपवाटिका याठिकाणी हलविले. त्याठिकाणी तीन तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व सोयीसुविधाची व्यवस्था करून अत्याधुनिक पद्धतीने उपचार सुरू झाले. गेल्या 24 तासापासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत असताना अखेर शुक्रवारी बिबट्याने अखेरचा श्वास घेतला.
सदरील बिबट्याचे 03 डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले असून मृत्यूच्या नेमक्या कारणाच्या अभिप्रायासाठी सदरील वन्यप्राण्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळा, औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार आहे.सदर प्रकरणी वनविभागाने तपास सुरू केला असून यामधे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल यासंदर्भात कोणालाही कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास वनविभागास माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवून त्यांना योग्य ते बक्षिस देण्यात येईल.
वनविभागाने केली प्रयत्नांची पराकाष्ठा
वनविभागातील कर्मचाऱ्यांनी बिबट्याचे प्राण वाचवण्यासाठी 3 डॉक्टरांचे पथक व रेस्क्यू टीम यांना पाचारण करून उपचाराची साधने, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर व इतर सर्व आवश्यक सुविधांची उपलब्ध करून औरंगाबाद व गुजरात येथील डॉक्टरांशी संपर्क साधून वन्यप्राणी बिबट्याचे प्राण वाचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच स्तरावरून तपास सुरू झाला असून लवकरच या प्रकरणातील सर्व बाबीचा उलगडा होईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.या मादी बिबट्यावर डॉ. व्ही. व्ही. चव्हाण पशुधन विकास अधिकारी सोयगाव,डॉ. शाम चव्हाण पशुधन विकास अधिकारी सिल्लोड,डॉ. रोहित धुमाळ विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा औरंगाबाद, वाय. व्ही. पाटील पशुधन पर्वेक्षक, ए. के. दाभाडे पशुधन पर्वेक्षक आदींच्या पथकांनी अथक प्रयत्न करून उपचार केले अखेरीस या बिबट्याने प्राण सोडला आहे.
या प्रकरणी सूर्यकांत मंकावर, उपवनसंरक्षक औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती पी.पी. पवार सहायक वन संरक्षक सिल्लोड ,वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ,वनपाल ए.टी.पाटील,जी एन सपकाळ वनरक्षक नितेश मुलताने,जी.टी नागरगोजे, सुनील हिरेकर,एस. टी चेके,सुदाम राठोड,एम शिंदे,कृष्णा पाटील,रेस्क्यू टीमचे सदस्य आदीगुडे सर,श्रीकांत वाहुळे आदी पुढील तपास करत आहे.