फैजपूर : प्रतिनिधी
येथील सतपंथ मंदीर संस्थानचे गुरुवर्य ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव अखंड नामसंकीर्तनाने साजरा केला जाणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. हा कार्यक्रम दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सतपंथ संस्थानच्या मंदिरात होणार आहे.
कोरोना महामारीमुळे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सामुहिक श्रद्धांजली सभेचे आयोजन केले नसून फक्त समाधी दर्शन व प्रसादाचे आयोजन केले आहे. ज्यामुळे गर्दी होणार नाही व आळीपाळीने दिवसभर भाविकांची ये-जा सुरू राहील, अशी यंत्रणा आहे. पंचक्रोशीतील संत-महंत तसेच लोकप्रतिनिधी व भाविकांच्या उपस्थितीत दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सतपंथ संस्थानच्या मंदिरात महापूजा केली जाणार असून दि.१४ डिसेंबर रोजी गुरुवर्य जगन्नाथ महाराज समाधीस्थळी (शेतात) सकाळी १० वाजता श्रद्धांजली व पादुकापूजन तसेच सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अखंड हरीनाम संकिर्तन होणार आहे. दरम्यान, याच दिवशी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ होईल, असे सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी कळविले आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी वैयक्तिक आमंत्रण किंवा पत्रिका न देता हेच आमंत्रण समजून पुण्यतिथी महोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन महाराजांनी केले आहे.