अंधश्रध्देसारख्या ज्वलंत समस्येला वाचा फोडणारा व जनसामान्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा नाट्यप्रयोग

0
55

एकविसाव्या शतकाकडे झेप घेणाऱ्या, अत्याधुनिकता व नवतंत्रज्ञानाची जोड मिळालेल्या आपल्या देशात आजही अज्ञान व अंधश्रध्देतून शेकडो लोकांचे बळी पडत आहेत. विशेषतः देशातील ग्रामीण भागात वाड्यावस्तीवर अशिक्षित कुटूंबामध्ये वंशाच्या दिव्यासाठी किंवा घरात सुखशांती लाभावी, यासाठी नवस फेडले जातात. त्यासाठी सावकाराकडे आपले दागिने गहाण ठेवण्याची वेळ येते. अशाच आशयाचे
मात्र सत्य घटनेवर आधारीत व अंधश्रध्देविषयी जागरुकता निर्माण करणारे ‘बळी’ हे नाटक जळगावच्या सुबोध बहुउद्देशिय युवा विकास प्रतिष्ठानने काल नाट्यस्पर्धेत सादर केले व ते रसिकांच्या पसंतीसही उतरले मात्र संथगतीमुळे ते अपेक्षित प्रभाव पाडण्यात कमी पडले.
लेखिका व दिग्दर्शिका रूपाली गुंगे यांच्या टिमने ‘बळी’ सादर करतांना जी मेहनत घेतली ती निश्‍चितच वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल.
पारंपारिक विचारसरणी आणि त्याचा आजच्या पिढीवर होणारा परिणाम तसेच शिक्षणाची कमतरता यातून विठोबा(प्रा.राज गुंगे) व शेवंता(निशा मिलींद पाटील) यांच्या सारख्या ऊसतोड मजूर कुटुंबाची होणारी ससेहोलपट व त्यातून नाहक पडणारे ‘बळी’ हा नाट्यप्रयोग ज्वलंत समस्या मांडणारा तसेच सामान्य जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला.अभिनयाच्या बाबतीत प्रा.राज गुंगे (विठोबा) यांनी मोलमजूरी करणारा कष्टाळू नायक उत्तमपणे रंगविला तर त्यास निशा मिलिंद पाटील (शेवंता) हिने तेवढीच दमदारपणे साथ दिली.विठोबाला साथ देणाऱ्या सहधर्मचारिणीचे पात्र तिने ताकदीनिशी रंगविले.शेवंता रंगवितांना तिला अबोली खंडाळे (सविता) आणि दिग्विजय जगदाळ(बबल्या) यांनीही चांगली साथ दिली. शेवटच्या टप्प्यात तर काही प्रसंगात दिग्विजयने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. ‘बळी’चे खास आकर्षण ठरला तो सजीव बोकड्या परशा(हिमेश बोरोले). याशिवाय कांचन आटाळे यांची ठसकेबाज रखूआई भाव मारुन गेली तर राहुल सोनवणेने तुकानाना उत्तम रंगविला.त्यास प्रेक्षकांनी टाळ्यांची साथ दिली. भूषण निकम (संजय), प्रशांत चौधरी(बाळू) व डॉ.गुलाब तडवी(भारत) यांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला. तांत्रिक बाजूत प्रा.राज गुंगे यांच्ो नेपथ्य नाटकाच्या विषयाला साजेशे व बळ देणारे ठरले. रूपेश जयस्वाल यांची प्रकाशयोजनाही चांगली मात्र ती त्यावर आणखी मेहनत घेणे आवश्‍यक होते. श्‍वेता रिल यांचे पार्श्वसंगीत ‘बळी’ला उठाव देणारे त्यात सविता शिंदे व भाग्यश्री अमृतकर यांची रंग व वेशभूषा देखील उल्लेखनीय. बाळासाहेब बोरकर,महादेव देवडे,किशोर शिंदे व सोनल यांची रंगमंच व्यवस्थाही उत्तम. दीपक सुरळकर,मिलींद नथ्थु पाटील, अनघा प्रविण गायधनी यांच्या
विशेष सहकार्यामुळे एका चांगल्या नाटकाचा आनंद प्रेक्षकांना घेता आला.निर्मिती प्रमुख रुपेश जयस्वाल यांच्यासह सर्वच टिमने मेहनत घेतल्याचे जाणवले.ग्रामीण वस्तीवरील घर,अंगण,तुळशी वृंदावन, गोठा तर दुसऱ्या अंकातील मालवाहू टेम्पोचा प्रवास व अपघात या साऱ्या दृश्‍यांमुळे नाटकाला सजीवपणा आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here