जळगाव, प्रतिनिधी । शुल्लक कारणावरून एका 42 वर्षीय युवकाला चार जणांनी लोखंडी रॉड ने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जुनी जोशी कॉलनी परिसरात राहणाऱ्या गिरीष दिलीप जोशी हे पत्नी मिनाक्षी यांच्यासह राहायला आहे. एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गिरीष जोशी यांच्या घराचे सांडपाणी हे शेजारी राहणारे उमेश हरी लागवे यांच्या अंगणात आले होते. याचा राग उमेश लागवे याला आल्याने त्याने लोखंडी रॉड घेवून गिरीष जोशी यांच्या डोक्यात हाणला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले तर तुषार हरी लागवे, मिनाबाई हरी लागवे आणि बेबीबाई ओंकार लागवे यांनी गिरीष जोशी यांची पत्नी मिनाक्षी यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली.
याप्रकरणी गिरीष जोशी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता धाव घेवून चौघांविरोधात तक्रार दिली. जोशी यांच्या तक्रारीवरून उमेश लागवे, तुषार लागवे, मिनाबाई लागवे आणि बेबीबाई लागवे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहे.