मुक्ताईनगर : प्रतिनिधी
हरिभाऊ जावळे कमिटीच्या निकषाप्रमाणे शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी केली आहे. ते जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सुनपूर्व वादळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी ते उचंदा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान त्यांनी खा. रक्षाताई खडसे यांची कोथळी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व तालुक्यातील पीक नुकसानीबाबत चर्चा करीत माहिती घेतली.
ना.फडणविस म्हणाले की, अवकाळी पावसाने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळी बागा पूर्णपणे भूईसपाट झाल्या असून शेतकर्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी शासनाने सर्वोतोपरी मदत करणे गरजेचे आहे. ज्या शेतकर्यांनी पीक विमा भरला नसेल त्यांनाही सरकारने मदत करायला हवी, असे म्हणत त्यांनी त्यांच्या कालखंडात झालेल्या नुकसानीदरम्यान ज्या शेतकर्यांचा पीक विमा नव्हता त्यांनाही आम्ही ५० टक्के नुकसान भरपाई दिली असल्याचे सांगितले. केळी पिकांच्या निकषासंदर्भात तत्कालीन सरकारने माजी आ.हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्वात एक कमिटी स्थापन केली होती. या कमिटीने ठरवून दिलेल्या निकषानुसार केळी पिकांचा पीक विमा काढण्यात आल्याने त्यावेळी केळी उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीबाबत केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळाली होती. मात्र यावेळी विम्याबाबत हरिभाऊ जावळे कमिटीचे निकष बाजूला ठेवत विमा काढण्यात आल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात हरिभाऊ जावळे कमिटीच्या निकषाबाबत नुकसान भरपाई मिळावी, असे फडणविस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही केला. केळी पिकांवरील करप्याबाबत मिळणारे औषध राज्य सरकारने बंद केले आहे, ते सुरु करावे, अशीही मागणी त्यांनी केली. दरम्यान, उंचदा, शेमळदा परिसरात ना.फडणविस यांनी शेतशिवारात जात नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री आ.गिरीश महाजन, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेश पाटील, माजी मंत्री आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, आ.राजुमामा भोळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके, सुरेश धनके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नेत्यांचा दौरा फोटोशूटसाठीच : शेतकर्यांचा आरोप
ना.देवेंद्र फडणविस उंचदा परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करुन परतत असतांना काही शेतकर्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. संतप्त शेतकर्यांनी हा दौरा फक्त फोटोशूटसाठीच असल्याचा दावा करत आमच्या शेताकडे पाहणीसाठी का येत नाही? असे म्हणत संताप व्यक्त केला. मेळसांगवी परिसरातील योगेश पाटील या शेतकर्याने सरकारकडून मदतीची कुठलीच अपेक्षा नसल्याचेही पत्रकारांसमोर म्हटले. यावेळी त्यांनी फडणविस सरकारच्या काळातही नुकसान भरपाई मिळाली नाही व आताही मिळणार नाही, असा संताप व्यक्त केला.
मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयास भेट देत खडसे यांच्या निवासस्थानी लावली हजेरी
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातले होते. यात केळी बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत. दौर्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट देत खा.रक्षाताई खडसे यांच्याशी सुमारे वीस मिनीटे हितगुज केले. त्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जावून रुग्णालयाची पाहणी केली. या हॉस्पीटलमध्ये कोविडच्या प्रतिकारासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून याबाबत फडणवीस यांनी माहिती जाणून घेत उपलब्ध सुविधांचा आढावा घेत कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर्स व कर्मचार्यांसह रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.