जळगाव, प्रतिनिधी I कृषीमित्र माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा 16 जून हा स्मृतीदिन जिल्ह्यात ‘केळी उत्पादक शेतकरी दिवस` म्हणून साजरा करण्याचा विचार व्हावा, अशा मागणीचे पत्र जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे.
जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, मागण्या वेळोवेळी शासन दरबारी मांडण्याचे काम शेतकरी नेते व माजी खासदार कृषीमित्र हरिभाऊ जावळे यांनी केले आहे. लोकसभा, विधानसभेत त्यांनी केळीशी निगडीत असलेले अनेक विषय अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून लावून धरले होते. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न कशाप्रकारे मिळेल याबाबत ते नेहमी प्रयत्नशील राहिले. त्यांचा स्मृतीदिन 16 जून रोजी आहे. या दिवशी त्यांचे स्मरण व्हावे व केळी उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी हा दिवस जिल्ह्यात ‘केळी उत्पादक शेतकरी दिवस` म्हणून साजरा करण्याबाबत विचार व्हावा.
या दिवशी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, कृषी विभाग, विद्यापीठ, संशोधन केंद्राचे अधिकारी, केळीतज्ज्ञ, शास्त्रज्ञ व केळी निर्यातदार यांच्या संयुक्त संमेलन आयोजित करण्यात यावे. जेणेकरून जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या शाश्वत विकासाचे हरिभाऊ जावळे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, असे नमूद केले.