सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन

0
4

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य शिंदे उपस्थितीत राहणार –

-उद्योगमंत्री सुभाष देसाई

 

मुंबई – प्रतिनिधी कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

श्री. देसाई यांनी सांगितले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एम आय डी सी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून या विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकूण 286 हेक्टर जमिन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. यासाठी सुमारे 520 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात आय आर बी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसेच ऑपरेशन्स (DBFO) साठी भाडेतत्वावर (लीजवर) हे काम देण्यात आले आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यासाठी एमआयडीसीने 14 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

विमान पत्तन प्राधिकरण, (Airport Authority of India) नागरी विमानन महानिदेशालय (DGCA) यांच्या तर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत आता विमान वाहतूक सुरू झाल्यामुळे अधिकाधिक पर्यटकांना पोहोचता येईल. या प्रकल्पामुळे कोकण वासियांच्या उत्कर्षाचा काळ सुरु झाला आहे, असेही श्री देसाई यावेळी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here